'सिझर'च्या दुसऱ्याच दिवशीच महिलेचा मृत्यू, संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयासमोर गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 01:26 PM2023-08-31T13:26:36+5:302023-08-31T13:27:36+5:30
डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याचा आरोप
उमरखेड (यवतमाळ) : येथील एका रुग्णालयात बाळंतपणासाठी महागाव तालुक्यातील महिलेला २८ ऑगस्टला दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी सिझरने प्रसूती झाली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र प्रकृती खालावत असल्याने तिला नांदेडला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. नांदेडला जाताना तिचा मृत्यू झाला. या घटनेने काही काळ येथील रुग्णालयासमोर संतप्त नातेवाइकांनी बुधवारी राडा केला.
रेखा गजानन येनकर (३०) रा. कोठारी ता. महागाव असे मृत महिलेचे नाव आहे. तिला कुटुंबीयांनी २८ ऑगस्ट रोजी येथील सत्यरूख हाॅस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी भरती केले होते. त्याच दिवशी तिच्यावर सिझर करण्यात आले. सिझर शस्त्रक्रियेतून गोंडस मुलीला जन्म दिला. नंतर तिच्यावर सत्यरूख हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांनी उपचार केले. मात्र रेखाची प्रकृती सतत खालावत होती. त्यामुळे डाॅक्टरांनी तिला नांदेडला हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कुटुंबीयांनी व डाॅक्टरांनी २९ ऑगस्टला नांदेड येथून एक खासगी रुग्णवाहिका बोलावली. या रुग्णवाहिकेतून रेखाला नांदेडला येथील यशोसाई हाॅस्पिटलमध्ये नेले जात होते. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला.
मंगळवारी सायंकाळ झाल्याने बुधवारी सकाळी नांदेड येथील रुग्णालयात रेखाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास रेखाचा मृतदेह घेऊन कुटुंबीय उमरखेड येथील रुग्णालयात पोहोचले.
चुकीच्या निदानामुळे आणि उपचारामुळे रेखाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला. सत्यरूख हाॅस्पिटलच्या संबंधित डाॅक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी बुधवारी संतप्त नातेवाइकांनी रुग्णवाहिका सत्यरूख हाॅस्पिटलसमोर आणली. कुटुंबीयांनी संबंधित डाॅक्टरांवर प्रश्नांचा भडीमार केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे बघून डाॅक्टरांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी रेखाचा मृतदेह हाॅस्पिटलमध्ये आणण्यास मज्जाव केला. संतापलेल्या रेखाच्या पतीने पोलिस ठाणे गाठून डाॅ. वैशाली सुनील बंग यांच्याविरुद्ध तक्रार दिली. वृत्तलिहिपर्यंत प्रक्रिया सुरू होती. या घटनेचे वृत्त कळताच बुधवारी सत्यरूख हाॅस्पिटलसमोर गर्दी झाली होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणेदार शंकर पांचाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
तणावाची परिस्थिती
रेखाचा मृतदेह कुटुंबीयांनी सत्यरूख हाॅस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. त्यामुळे काहीकाळ बुधवारी सायंकाळी हाॅस्पिटलसमोर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. रेखाचा पती गजानन येनकर यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतरच प्रकरण निवळले. डाॅ. वैशाली बंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या आपली मनस्थिती चांगली नसल्याचे सांगितले. त्यामुळे कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला.
महागाव तालुक्यातील कोठारी येथील रेखा गजानन येनकर यांचा डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची तक्रार मिळाली आहे. याप्रकरणाची सखोल चाैकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.
- शंकर पांचाळ, ठाणेदार, उमरखेड