घरकुलासाठी महिलांची पंचायत समितीवर धडक, वंचितांना डावलण्यात आल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 05:38 PM2022-01-27T17:38:03+5:302022-01-27T17:46:30+5:30
चुरमुरा येथील गरजू, विधवा, दिव्यांगांना घरकूल यादीतून डावलण्यात आले. त्यामुळे विधवा, दिव्यांग, वयोवृद्ध व गरजू महिलांनी पंचायत समितीवर धडक दिली.
यवतमाळ : ग्रामपंचायतीने तयार केलेल्या घरकूल यादीत नियमांना डावलून सरपंचाच्या नातेवाईकांना घरकूल मंजूर केल्याचा आरोप करीत गुरुवारी उमरखेड तालुक्यातील चुरमुरा येथील महिलांनी पंचायत समितीवर धडक दिली.
चुरमुरा येथील गरजू, विधवा, दिव्यांगांना घरकूल यादीतून डावलण्यात आले. त्यामुळे विधवा, दिव्यांग, वयोवृद्ध व गरजू महिलांनी पंचायत समितीवर धडक दिली. त्यांनी गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांना निवेदन दिले. त्यातून सरपंच व सदस्यांनी सत्तेचा दुरुपयोग करीत घरकूल प्रतीक्षा यादीत आपल्या नातेवाईकांची नावे समाविष्ट केल्याचा आरोप केला. अनेक वर्षांपासून घरकुलापासून वंचित लोकांना डावलण्यात आल्याचा आरोपही केला.
नियमानुसार आत्महत्याग्रस्त, विधवा, दिव्यांग, शेतमजूर, परित्यक्ता आदी गरजूंना प्रथम लाभ देणे गरजेचे असते. मात्र, त्यांना डावलून सरपंचांनी नातेवाईकांची नावे घरकूल लाभार्थी यादीत समाविष्ट केली. यामुळे गरजूंवर अन्याय झाल्याची कैफियत त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांसमोर मांडली. महिलांनी ती यादी रद्द करून निकषानुसार गरजवंतांना लाभ देण्याची मागणी केली. यावेळी चुरमुरा येथील आशा आडे, मथुरा राठोड, शकुंतला चव्हाण, शांता राठोड, रंजना राठोड, निर्मला चव्हाण, पंचीबाई राठोड, पारूबाई राठोड, दगडीबाई राठोड, गोदावरी राठोड, सारजा पवार आदी उपस्थित होत्या.
चुरमुरा येथील घरकूल यादी तालुकास्तरीय समितीकडून सर्वेक्षण करून निकषाप्रमाणे गरजूंना न्याय देण्यास सांगितले आहे.
- प्रवीण वानखेडे, गटविकास अधिकारी, उमरखेड
ग्रामसभेत घरकुलाच्या यादीचे वाचन झाले. परंतु खरी निवड ग्रामसभेत झाली नाही. सरपंच व सदस्यांनी बंद खोलीत बसून सचिवासोबत यादी केली. त्यात सरपंच व सदस्यांचे नातेवाईक यांचे नाव टाकून यादी तयार केली. त्यामुळे गरजूंवर अन्याय झाला.
-अर्जुन जाधव, उपसरपंच, चुरमुरा