महिला पोलीसच निघाली चोर
By Admin | Published: February 24, 2015 12:53 AM2015-02-24T00:53:58+5:302015-02-24T00:53:58+5:30
यात्रेत सुरक्षिततेसाठी बंदोबस्तावर असलेल्या एका महिला पोलीस शिपायाचे १२ फेब्रुवारीला
आर्णी : यात्रेत सुरक्षिततेसाठी बंदोबस्तावर असलेल्या एका महिला पोलीस शिपायाचे १२ फेब्रुवारीला एटीएमसह पाकीट चोरीस गेले होते. ही घटना येथील जिल्हा परिषद विश्रामगृहावर घडली होती. तपासात दुसरा-तिसरा कुणीही चोरटा निघाला नाही तर चक्क सहकारी महिला पोलीस शिपायानेच पाकिटावर हात साफ केल्याचे वास्तव पुढे आले. नव्हे तर पोलिसांनी आता जोडधंदा म्हणून चोरीचा पर्याय तर निवडला नाही ना अशी कुजबुज खुद्द पोलीस खात्यातूनच ऐकायला मिळत आहे.
दुर्गा मंगलसिंग जाधव असे पाकीट उडविणाऱ्या महिला पोलीस शिपायाचे नाव आहे. आर्णी येथे एका यात्रेदरम्यान दुर्गासोबतच यवतमाळच्या पोलीस मुख्यालयात कार्यरत सोनू नामक तिची सहकारी बंदोबस्त कर्तव्यावर होती. दरम्यान १२ फेब्रुवारीला सायंकाळी सोनूला आपले पाकीट चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यामध्ये एटीएम कार्डही होते. ही बाब लक्षात येत नाही तोच आर्णी येथील बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मशीनमधून रोख काढल्या गेल्याचा सोनूला मॅसेज आला. त्यानंतर तिने या प्रकरणी आर्णी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी बँक आॅफ इंडियाच्या एटीएम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यामध्ये पैसे काढताना दुर्गा आढळून आली. त्यावरून पोलिसांनी तिला अटक केली. (शहर प्रतिनिधी)
गुन्ह्याची कबुली, प्रात्यक्षिक दाखविले, पाकीट जप्त
४अटकेनंतर दुर्गाने पोलिसांपुढे सहकारी सोनूचे पाकीट उडविल्याची कबुली दिली. तसेच आर्णी पोलिसांनी तिच्याकडून घटनेचे प्रात्यक्षिक करवून घेतले. विश्रामभवनात पॅन्ट कुठे अडकविला होता. त्यानंतर चोरी कशी केली. रिकामे पाकीट फेकल्याचे ठिकाण अशी इत्थंभूत माहिती तिने यावेळी दिली. दरम्यान तिला येथील न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली. या घटनेची चर्चा आर्णी शहरात कर्णोपकर्णी आहे.