महिला एसटी वाहकांचा गणवेश अडचणीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:19 PM2019-03-15T22:19:38+5:302019-03-15T22:20:33+5:30
राज्य परिवहन सेवेत खाकी गणवेश धारण करून तिकीटवाटपाची कामगिरी करणाऱ्या महिला वाहकांना आता नवीन गणवेशाचे वाटप प्रशासनामार्फत करण्यात येत आहे़ मात्र या गणवेशाबद्दल महिला वाहकांमध्ये प्रचंड रोष असून पूर्वीचाच गणवेश देण्यात यावा, अशी मागणी महिला वाहकांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : राज्य परिवहन सेवेत खाकी गणवेश धारण करून तिकीटवाटपाची कामगिरी करणाऱ्या महिला वाहकांना आता नवीन गणवेशाचे वाटप प्रशासनामार्फत करण्यात येत आहे़ मात्र या गणवेशाबद्दल महिला वाहकांमध्ये प्रचंड रोष असून पूर्वीचाच गणवेश देण्यात यावा, अशी मागणी महिला वाहकांनी केली आहे.
हा नवीन गणवेश शाळकरी मुलींसारखा असून ग्रामीण भागात असा विदूषकी गणवेश घालून वाहकाची कामगिरी करताना चेष्टेला सामोरे जावे लागत आहे. दिलेले गणवेश हे योग्य मापाचे नसल्यामुळे तंग पॅन्ट, ढगळे कुडते अडकवून महिला वाहकांना बुजगावण्यासारखे वावरावे लागत आहे. सदरच्या विचित्र गणवेशाबद्दल महिला वाहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. हा गणवेश ठरविताना काही मोजक्याच प्रतिनिधींना बोलावून संमती घेण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात हा गणवेश धारण केल्यानंतर अनेक असुविधा निर्माण होत असल्याची भावना महिला वाहक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे नवीन गणवेशाऐवजी पूर्वीचाच गणवेश द्यावा, अशी मागणी पांढरकवडा येथील महिला वाहकांनी यवतमाळ येथील कामगार अधिकारी सुनील मडावी यांच्याकडे केली आहे.