्रपाण्यासाठी महिला नगरपरिषदेवर धडकल्या
By admin | Published: May 20, 2016 02:15 AM2016-05-20T02:15:35+5:302016-05-20T02:15:35+5:30
शहरातील पाटीपुरा येथील बोधीसत्व चौकातील बोअरवेलमधून नळयोजना आहे. मात्र, येथील बोअरवेल चार
यवतमाळ : शहरातील पाटीपुरा येथील बोधीसत्व चौकातील बोअरवेलमधून नळयोजना आहे. मात्र, येथील बोअरवेल चार महिन्यांपासून बंद असल्याने परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी गुरुवारी दुपारी नगरपरिषद कार्यालयावर धडक देऊन जाब विचारला.
पाणीपुरवठा करणाऱ्या बोअरवेलमधील पंप नादुरूस्त आहे. याची माहिती नगरपरिषदेकडे देऊनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. दलितवस्ती परिसरात प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जाते. रवीदासनगर, कळंब चौक, भोईपुरा, डोर्लीपुरा, रामरहीमनगर या भागात अनेक समस्या प्रलंबित आहेत. जीवन प्राधिकरणाकडून पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. कमी दाबामुळे नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. या परिसरात पाण्याचे टँकर केवळ दोनदाच फिरकले. त्यानंतर टँकर दिसलाच नाही. या भागातील टंचाई निवारण्यासाठी भरीव उपाययोजना कराव्या, अशी मागणी महिलांनी केली आहे. मुख्याधिकारी सुदाम धुपे नगरपरिषदेत गैरहजर असल्याने महिलांनी अधीक्षक मनोहर गुल्हाने यांना निवेदन दिले.
यावेळी प्रमोदिनी रामटेके, रमाबाई सोनटक्के, कविता नागदिवे, मंदा सोनटक्के, शारदा नागदिवे, भावना गायकवाड, जयश्री गजभिये, कल्पना बागडे, द्रोपदा ढेमरे, रत्नमाला चव्हाण, कुसूम रामटेके, सुलोचना बागडे आदींसह परिसरातील ५१ महिला उपस्थित होत्या. (कार्यालय प्रतिनिधी)