महिलांना स्वसंरक्षणासाठी कट्यार, मिरची स्प्रे आणि बचाव बटन देणार - प्रवीण तोगडिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 11:10 AM2023-02-08T11:10:02+5:302023-02-08T11:16:11+5:30
हिंदूंच्या सुदृढ आरोग्यासाठी दहा हजार डॉक्टरांची फौज
यवतमाळ : आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी मंगळवारी यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घेतली. देशभरातील चार लाखांपेक्षा अधिक महिलांवर अत्याचार झाले आहेत. हे अत्याचार रोखण्यासाठी आता राष्ट्रीय महिला परिषद ओजस्वी संघटना पुढाकार घेणार असून महिलांना स्वसंरक्षणासाठी मिरची स्प्रे, बचाव बटन आणि कट्यार दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
समृद्ध, सुरक्षित, सन्मानयुक्त हिंदू या मोहिमेतून आता हिंदूही आगे या विचारधारेला पुढे नेण्यासाठी देशभरात अभियान सुरू केले आहे. याच अभियानाचा भाग म्हणून महाराष्ट्रात दौरे करीत असल्याचे तोगडिया यांनी सांगितले. यावेळी त्यांनी संघटनेच्या प्रमुख धोरणाविषयी माहिती दिली. येणाऱ्या काळात देशातील एक कोटी हिंदू परिवारांकडून एक मुठ्ठी अनाज गोळा करणार आहे. गोळा झालेले हे धान्य देशभरातील ३० ते ४० लाख गरीब हिंदूंना वाटले जाणार आहे. ही हिंदू रेशन मोहीम असेल असे ते म्हणाले. यासोबतच प्रत्येक हिंदू निरोगी आणि सुदृढ असावा, यासाठी दहा हजार डॉक्टरांची फौज तयार करण्यात आली आहे. या मोहिमेला एप्रिलपासून मोफत उपचार पद्धतीने प्रारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला नागपूरचे महामंत्री किशोर दिकोंडवार, वर्धा येथील अनुप जयस्वाल, प्रांतमंत्री संतोष ठाकूर आणि मनिष जयस्वाल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पाकिस्तानातील हिंदूंवरील अत्याचार रोखा
नेहरू-लियाकत कराराच्या आधारे पाकिस्तानातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराला रोखता येते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याच माध्यमातून हिंदूंवरील अन्याय रोखला होता. त्यावेळी पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. आता अशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी नेहरू-लियाकत करारानुसार हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. त्यांच्यावर मिसाईल डागा किंवा नद्यांचे पाणी बंद करा, असा सल्ला तोगडिया यांनी पत्रकार परिषदेत दिला.