डिप निळोणासाठी महिलांचे योगदान
By admin | Published: May 25, 2016 12:11 AM2016-05-25T00:11:50+5:302016-05-25T00:11:50+5:30
नागरिकांनी निळोणा धरण उपसण्याचा उपक्रम सुरू केला असून त्याला सर्व स्तरातून प्रतिसाद लाभत आहे.
यवतमाळ : नागरिकांनी निळोणा धरण उपसण्याचा उपक्रम सुरू केला असून त्याला सर्व स्तरातून प्रतिसाद लाभत आहे. यवतमाळातील महिलांनी केवळ पाच दिवसात ५६ हजारांचा निधी गोळा करून दिला.
राणाप्रतापनगर व स्रेहनगर या भागातील प्रेरणा महिला मंडळाच्या सदस्यांनी निळोणा धरणाला भेट दिली. प्रयास संघटनेतर्फे सुरू असलेले निळोणा धरण खोलीकरणाचे काम त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. धरणातील पाण्याची पातळी प्रचंड घटल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे डिप निळोणा उपक्रमासाठी आपणही १५ हजार रुपयांचा निधी जमवून देण्याचे महिलांनी जाहीर केले. उन्हात घरोघरी फिरून या महिलांनी नागरिकांना डिप निळोणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद लाभून केवळ पाच दिवसात ५६ हजार रुपयांचा निधी गोळा झाला. बाबासाहेब नंदूरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हा निधी प्रयासचे डॉ.सावजी यांना सुपूर्द करण्यात आला.
यावेळी डॉ.सावजी, नगराध्यक्ष सुभाष राय, मुख्याधिकारी सुदाम धुपे यांच्या हस्ते या महिलांचा सत्कार करण्यात आला. निधी गोळा करण्यासाठी प्रेरणा महिला मंडळाच्या उपाध्यक्ष कीर्ती राऊत, कोषाध्यक्ष वंदना नखाते, सचिव रजनी राय, सदस्य किरण राऊत, नीता झरकर, प्रांजली वालोकर, माया ठाकरे, बोदडे आदींनी परिश्रम घेतले. (स्थानिक प्रतिनिधी)