दारूविक्रीविरूद्ध महिलांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:00 AM2018-06-20T00:00:05+5:302018-06-20T00:00:05+5:30
वणी तालुक्यातील नायगावलगत एका पानठेल्यातून अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सदर पानठेला पेटवून दिला. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तणावाची स्थिती निर्माण झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी तालुक्यातील नायगावलगत एका पानठेल्यातून अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सदर पानठेला पेटवून दिला. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तणावाची स्थिती निर्माण झाली. अवैध दारूविक्रेत्याविरूद्ध कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती.
शासनाने राज्य मार्गालगतचे बिअर बार व दारूविक्रीचे दुकाने बंद केल्याने तालुक्यात अवैध दारूविक्रीचे अड्डे वाढले आहेत. वणी-वरोरा मार्गावर नायगाव येथे रस्त्यालगत एका ठेल्यामधून अवैधपणे दारूविक्री होत होती. तसेच बंद झालेल्या एका बिअर बारलगतसुद्धा अवैधपणे दारूविक्री होत होती. ही बाब नायगाव व सावर्ला येथील नागरिकांच्या लक्षात आली. त्यामुळे गावातील महिला संतप्त झाल्या व त्यांनी मंगळवारी हा ठेलाच पेटवून तासभर राज्य मार्ग रोखून धरला. वणी पोलीस घटनास्थळी पोहोचून आंदोलनातील काही महिला व पुरूषांना स्थानबद्ध केले व त्यांना समज देऊन काही वेळाने सोडून देण्यात आले. यावेळी पोलिसांनी आश्वासन दिल्यामुळे महिलांनी हे आंदोलन मागे घेतले.
त्यातील काही महिलांनी बंद बिअर बारजवळील ठेला पेटविण्यासाठी धाव घेतली. तेव्हा दारूविक्री करणारा एक इसम दारूच्या शिश्या भरलेली थैली सोडून पळून गेला. वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे आपल्या पोलीस ताफ्यासह पोहोचल्यामुळे हा ठेला मात्र बचावला. पोलिसांनी अखेर दारूविक्री करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरूद्ध मुंबई दारूबंदी अधिनियम ६५ ई अंतर्गत गुन्हा नोंदवून दारूच्या ३२ (एक हजार ७६० रूपये) शिश्या घटनास्थळावरून जप्त केल्या. एक तास राज्य मार्ग रोखून धरल्याने रस्त्याच्या दोन्हीही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एक तासानंतर तणाव निवळल्यानंतर राज्य मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली होती.