जिल्हा परिषदेत महिला राज
By admin | Published: April 4, 2017 12:01 AM2017-04-04T00:01:57+5:302017-04-04T00:01:57+5:30
जिल्हा परिषद विषय समिती सभापतींच्या निवडीत सोमवारी महिलांनीच बाजी मारली.
सभापती : काँग्रेसच्या खंडाळकर, भाजपाच्या भुमकाळे, अपक्ष दरणे, राकाँचे मानकर
यवतमाळ : जिल्हा परिषद विषय समिती सभापतींच्या निवडीत सोमवारी महिलांनीच बाजी मारली. तीन समित्यांवर महिला सभापती विराजमान झाल्या असून अध्यक्षही महिलाच आहे. त्यामुळे ‘मिनी मंत्रालयाचा’ संपूर्ण कारभार महिलांच्याच हाती एकवटला आहे. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी आणि अपक्ष या ४१ सदस्यांच्या महायुतीने सभापतींची निवड केली. शिवसेनेला मात्र अध्यक्षपदा पाठोपाठ सभापतीपदांनीही हुलकावणी दिली.
महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी मारेगाव तालुक्यातील कुंभा-मार्डी गटाच्या अरुणा अरुण खंडाळकर (काँग्रेस), समाज कल्याण समिती सभापतीपदी बाभूळगाव तालुक्यातील पहूर-सावर गटाच्या प्रज्ञा प्रकाश भुमकाळे (भाजपा), शिक्षण व आरोग्य समिती सभापतीपदी कळंब तालुक्यातील कोठा-सावरगाव गटाच्या नंदिनी दत्ता दरणे (अपक्ष) आणि बांधकाम व अर्थ समिती सभापतीपदी पांढरकवडा तालुक्यातील मोहदा-करंजी गटाचे निमीष मानकर (राष्ट्रवादी) यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष पदाच्या निवडीत सर्वाधिक संख्याबळ असलेल्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐनवेळी बदललेल्या भूमिकेने सत्तेबाहेर बसावे लागले होते. यात अनपेक्षितपणे काँग्रेसला लॉटरी लागली. याचा वचपा शिवसेना विषय समिती सभापती निवड प्रक्रियेत काढण्याच्या तयारीत होती. मात्र पुसदमधून प्रतिसाद न मिळाल्याने शिवसेनेच्या मनसुब्यावर पाणी फेरले. त्यानंतरही शिवसेनेकडून विषय समितीच्या चार जागांसाठी पाच उमेदवार उभे केले. त्यात राज्यमंत्री संजय राठोड यांचे बंधू विजय राठोड, डॉ. रुख्मिणा उकंडे, कविता इंगळे, गजानन बेजंकीवार, चितांगराव कदम यांचा समावेश होता. यामुळे सभागृहात निवड प्रक्रिया घेण्यात आली. शिवसेना उमेदवारांना केवळ २० मते मिळाली. तर महायुतीच्या उमेदवारांनी ४१ मतांची आघाडी घेतली.
सकाळी ११ ते १ वाजता दरम्यान नामांकन दाखल करण्याची वेळ होती. त्यानंतर दुपारी ३ वाजता निवड सभेला सुरूवात झाली. आवाजी मतदानाने सभापतींची निवड झाली. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या वेळी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसारच ही प्रक्रिया पार पडली. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय गोटातील चर्चेला पूर्णविराम मिळाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राजेंद्र देशमुख तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपमुख्याधिकारी अरूण मोहोड उपस्थित होते.
राळेगाव विधानसभेत तीन सभापती
राळेगाव विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेची सत्ता केंद्रित झाली आहे. बाभूळगाव तालुक्यातील पहूर गटाला समाजकल्याण सभापती, कळंब तालुक्यात आरोग्य व शिक्षण समिती सभापती तर करंजी मोहदा गटामध्ये अर्थ व बांधकाम समिती सभापती पद देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेतील प्रमुख विभागाचे सभापती राळेगाव विधानसभा क्षेत्रातील असल्याने विशेष महत्व आले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांची पुन्हा घोषणा बाजी
सभापती निवडप्रक्रिया पार पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर जोरदार घोषणा बाजी सुरू केली. अंगार है... भंगार हैची घोषणा होताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनीसुध्दा घोषणा बाजी सुरू केली. यातच अपक्ष सभापतींच्या समर्थकांनीसुध्दा नारे लावले. यामुळे काही क्षण दुहीचे वातावरण निर्माण झाले होते. निर्वाचित सदस्यांनी लगेच मध्यस्थी करून काँग्रेस-भाजप-राष्ट्रवादी महायुतीचा विजय असे नारे लावण्याची सूचना केली. त्यानंतर प्रत्येक पक्षातील नेत्याचे नाव घेऊन जय घोष करण्यात आला.