जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात महिलांचा ठिय्या
By Admin | Published: June 14, 2014 02:33 AM2014-06-14T02:33:09+5:302014-06-14T02:33:09+5:30
वणी तालुक्यातील वेळाबाई येथील महिलांनी वाईनबारच्या विरोधासाठी शुक्रवारी दुपारी ...
यवतमाळ : वणी तालुक्यातील वेळाबाई येथील महिलांनी वाईनबारच्या विरोधासाठी शुक्रवारी दुपारी चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच ठिय्या दिला. पोलिसांना पाचारण
करून हे आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. महिलांचा रोष पाहता त्यांना निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात सुनावणी घेण्याचे आश्वासन दिले.
वेळाबाई ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने सरपंच व सदस्यांना विश्वासात न घेता परस्परच ग्रामसभेचा बनावट ठराव घेऊन तेथे वाईनबार सुरू करण्याला परवानगी दिली. हा
प्रकार माहीत झाल्यानंतर गावातील महिलांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी निवेदन दिले. मात्र यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे
संतप्त झालेल्या महिलांनी पुन्हा आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी रितसर परवानगी मागितली. मात्र
त्यांना तब्बल एक तास उशिराची वेळ देण्यात आली. महिलांनी थेट कक्षात प्रवेश घेतला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन गावात बिअरबारच्या परवानगी संदर्भात मतदान
केव्हा घेता, हे सांगा अशी विचारणा केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अखत्यारितील असल्याचे सांगून तेथे जाण्याचा सल्ला दिला.
यावर महिलांनी तुम्ही असे स्टॅम्प पेपरवर लिहून देता का, असा सवाल केला. त्यानंतर संतापलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी महिलांना बाहेर जाण्यास सांगितले. निर्णय मिळत नाही
तोपर्यंत महिलांनी कक्षासमोरच ठिय्या मारला. हा आक्रमक पवित्रा पाहता तेथे पोलिसांना पाचारण करण्यात आले. तर जिल्हाधिकाऱ्यांनी मागच्या दरवाजाने प्रस्थान केले.
पोलिसांनी महिलांना कक्षाबाहेर काढले. सहायक पोलीस निरीक्षक माळवे यांनी महिलांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. शेवटी या महिलांनी निवासी
उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मतदान घेण्याची मागणी केली. अर्जावर असलेल्या महिलांच्या स्वाक्षऱ्यांची पडताळणी करण्यासाठी १८ जूनची तारीख दिली. त्यानंतर या
महिलाांनी आपले आंदोलन मागे घेतले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य संगीता राजूरकर, ग्रामपंचायत सदस्य मंदा झाडे, विकास शेडामे, आनंदाबाई काकडे, गीता काकडे
आदी महिला उपस्थित होत्या. (कार्यालय प्रतिनिधी)