वर्क ऑर्डर मिळूनही करता येणार नाही कामे, जाणून घ्या कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 06:08 PM2024-10-25T18:08:00+5:302024-10-25T18:08:42+5:30
आचारसंहिता समितीचा 'वॉच' : कंत्राटदारांना करावी लागणार प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही, यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. आचारसंहितेत विकासकामे रखडली जाऊ नये, यासाठी आवश्यक त्या कामांची प्रशासकीय मान्यता घेत वर्क ऑर्डर काढण्यात आल्या. मात्र, कंत्राटदारांनी तत्काळ कामे सुरू केली नाही. आता आचारसंहिता लागू असल्याने कंत्राटदारांना या कालावधीत कामे करता येणार नाही. आचारसंहिता समितीचाही वॉच राहणार आहे.
लोकसभा निवडणूक काळात विकासकामांना मोठ्या प्रमाणात ब्रेक बसला होता. जून महिन्यात आचारसंहिता संपताच कामाचा सपाटा सुरू झाला. त्याला पाच महिने होत नाही तोच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची भीती नेते मंडळीसह प्रशासनात सतावत होती. कामे मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून आग्रह धरला गेला. यामुळे आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक एक व दोनकडून विकासकामांच्या वर्क ऑर्डर काढण्यात आल्या. वर्क ऑर्डर मिळताच कंत्राटदार बिनधास्त झाले. आता कधीही कामे करता येईल, असे त्यांना वाटू लागले.
काहींनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तर, काहींनी आज-उद्यावर जोर दिला आणि आचारसंहिता लागू झाली. ज्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवातच केली नाही, त्यांना आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या कालावधीत कामे सुरू झाल्यास आचारसंहिता समितीकडून कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय कोणत्याही कामाला प्रशासकीय मान्यता देता येणार नाही.
विधानसभा निवडणुकीत कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांना ब्रेक लागला आहे. ही कामे निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावरच करता येणार आहे. नागरिकांनाही यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
प्रशासकीय मान्यताही नाही
२२ ऑक्टोबरपासून निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे या कालावधीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी लागणार आहे. कोणत्याही प्रकारच्या कामांना प्रशासकीय मान्यता देता येणार नाही. प्रशासकीय मान्यता झाली असल्यास वर्क ऑर्डर देता येणार नाही.
काय दिले निर्देश
ज्या कामांची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. परंतु, प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही, अशी कामेही सद्यःस्थितीत सुरू करू नये, असेही निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी दिले.
"वर्क ऑर्डर मिळाल्यावर ज्यांनी कामांना सुरुवात केली अशी कामे करता येणार आहे. मात्र, ज्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवातच केली नाही, त्यांना काम करता येणार नाही. तशा सूचना करण्यात आल्या आहेत. आचारसंहिता कालावधीत कामे सुरू केल्यास आचारसंहिता समितीकडून कारवाई करण्यात येईल."
- मंदार पत्की, मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ,