मृत व्यक्ती राबला रोहयोच्या कामावर
By admin | Published: June 11, 2014 12:18 AM2014-06-11T00:18:14+5:302014-06-11T00:18:14+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावर चक्क मृत व्यक्ती राबल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील चोंढी येथे उघडकीस आला. एवढेच नाही तर करळगावच्या पोस्टातून त्याच्या नावावर पैसेही काढण्यात
पैसेही उचलले : चोंढी ग्रामपंचायतीचा प्रताप
आरिफ अली - बाभूळगाव
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावर चक्क मृत व्यक्ती राबल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील चोंढी येथे उघडकीस आला. एवढेच नाही तर करळगावच्या पोस्टातून त्याच्या नावावर पैसेही काढण्यात आले. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.
चोंढी येथील श्रीकृष्ण नागोराव राजूरकर यांनी १५ फेब्रुवारी २००६ रोजी चोंढी ग्रामपंचायतीतून जॉब कार्ड काढले होते. त्यानंतर १४ जून २००६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल दोन वर्षाने १८ एप्रिल २००८ ते ६ जून २००८ असे ४८ दिवस रोहयोच्या कामावर राबल्याची नोंद आहे. या कालावधीत त्यांनी राणाअमरावती जलबंधारा क्र. १, उमरी जलबंधारा क्र. २, उमर्डा जलबंधारा क्र. १ या ठिकाणी रोहयोचे काम केल्याची नोंद आहे. तसेच त्यापोटी त्यांच्या नावावर पाच हजार ३९५ रुपये मजुरी करळगावच्या पोस्टात जमा झाली. ती मजुरीही त्यांनी उचलल्याची नोंद आहे. मृत व्यक्ती कामावर राबला कसा असा संशोधनाचा विषय आहे.
गोरगरिबांचे जॉब कार्ड गोळा करून कामावर उपस्थित असल्याची नोंद घेतली जाते. एवढेच नाही तर त्यांच्या नावावर पैसेही उचलले जातात, असाच हा प्रकार दिसून येत आहे.