राळेगाव बसस्थानकाचे काम दीड वर्षानंतरही अर्धवटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 10:15 PM2018-12-02T22:15:37+5:302018-12-02T22:16:11+5:30
येथील बसस्थानकाचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरुच आहे. सध्या वास्तू बांधून पूर्ण झाली. मात्र अद्याप इलेक्ट्रीक फिटींग व रंगरंगोटीचे काम शिल्लकच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : येथील बसस्थानकाचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरुच आहे. सध्या वास्तू बांधून पूर्ण झाली. मात्र अद्याप इलेक्ट्रीक फिटींग व रंगरंगोटीचे काम शिल्लकच आहे.
येथील बसस्थानकाचे काम सहा महिन्यात पूर्ण करावयाचे होते. मात्र एसटी प्रशासनात समन्वय नसल्याने तब्बल दीड वर्षे लोटूनही काम अपूर्णच आहे. नवीन वर्षात तरी बसस्थानक प्रवाशांच्या सुविधेकरीता सुरू होईल किंवा नाही, याबाबत साशंकता आहे. सुमारे ४२ लाख रुपयांची ही वास्तू आता बांधून पूर्ण झाली. मा इलेक्ट्रीकेशनचा ठेका आत्तापर्यंत दिला गेला नाही. त्यामुळे इलेक्ट्रीकची कामे पूर्ण होऊन रंगरंगोटी आटोपून इमारतीचे लोकार्पण करता आले नाही.
गेल््या दीड वर्षात उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात विद्यार्थी, महिला, रुग्ण, वृद्ध आदी प्रवाशांना तासन्तास ताटकळत उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागली. येथून दररोज किमान १२५ ते १५० बसफेऱ्या चालतात. सात ते दहा हजार प्रवाशी दररोज प्रवास करतात. त्यांना छायेकरीता एकही छायादार वृक्ष येथे नाही. हॉटेल नाही, प्रसाधनगृहाची स्थिती अत्यंत वाईट आहे. रात्री केवळ एक-दोन लाईटसुद्धा लावले जात नसल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
पाणीही नाही
येथील बसस्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. आगार प्रमुख व विभागीय नियंत्रक आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे वरचेवर भेट देऊन आवश्यक सुविधांच्या दुर्दशांची पाहणी करावी. त्या उपलब्ध करून द्याव्या व वास्तू त्वरित पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलावी, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे.