पोलीस संरक्षणात झाली कामगार नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 09:41 PM2019-06-24T21:41:02+5:302019-06-24T21:41:17+5:30
कामगार कार्यालयात नोंदणी करण्यासाठी सोमवारी मजुरांनी प्रचंड गर्दी केली. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलीस संरक्षण मागविण्यात आले होते. पोलीस संरक्षणात कामगार नोंदणीची प्रक्रिया पार पाडावी लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कामगार कार्यालयात नोंदणी करण्यासाठी सोमवारी मजुरांनी प्रचंड गर्दी केली. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलीस संरक्षण मागविण्यात आले होते. पोलीस संरक्षणात कामगार नोंदणीची प्रक्रिया पार पाडावी लागली.
कामगार नोंदणी करण्यासाठी जिल्हा मुख्यालयच केंद्र म्हणून निश्चित करण्यात आले आहे. नोंदणीसाठी केवळ सोमवार हा एकच दिवस निश्चित करण्यात आला. यामुळे येथे प्रत्येक आठवड्यात एकच गर्दी होत आहे. सोमवारी मजुरांची रांग खालच्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. गर्दी आवाक्याबाहेर गेल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. गर्दीवर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्यात आला होता. नोंदणीसाठी टेबलची संख्याही वाढविली होती.
दलालांनी थाटली ‘दुकानदारी’
शासकीय योजनेचा अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात दलालांनी दुकानदारी थाटली होती. अर्ज भरून देण्यासाठी दलाल मजुरांकडून पैसे घेत होते. कार्यालयाच्या बाहेर असलेल्या झेरॉक्सवर अर्जाची प्रत मिळविण्यासाठी मजुरांची गर्दी होती. तेथे दोन पानी अर्जाचे सहा रूपये घेतले जात होते. दलालांवर नियंत्रण मिळविण्यात कामगार कार्यालयासह जिल्हा प्रशासनाला अपयश आले. ग्राहक न्यायालय, कामगार कार्यालयाची इमारत असलेल्या पायºया आणि सायकल स्टँडसह झाडाच्या आश्रयाला दलाल मंडळी पहायला मिळाली.