‘वसंत’चे कामगार धडकले कारखान्यावर
By admin | Published: January 13, 2015 11:07 PM2015-01-13T23:07:25+5:302015-01-13T23:07:25+5:30
गत आठ महिन्यांपासून वेतन न मिळालेल्याने संतप्त झालेले वसंत सहकारी साखर कारखान्याचे कामगार कारखान्यावर धडकले. कारखाना प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही दखल घेतली नाही.
थकीत वेतन : संचालक मंडळाबद्दल कामगारांत असंतोष
उमरखेड : गत आठ महिन्यांपासून वेतन न मिळालेल्याने संतप्त झालेले वसंत सहकारी साखर कारखान्याचे कामगार कारखान्यावर धडकले. कारखाना प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही दखल घेतली नाही. त्यामुळे मंगळवारी दुपारी १२ वाजता कामगारांनी मोर्चा काढून आपला निषेध नोंदविला.
वसंत सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू करण्यासाठी जिल्हा बँकेने मोठी रक्कम दिली. तसेच मोलॅसिस (भंगार विक्री), प्रेसमड, येणे वसुली यातून कारखान्याला दरवर्षी रक्कम मिळाली आहे. असे असताना गेल्या पाच वर्षांपासून कामगारांचा पगार थकीत ठेवण्यात येत आहे. यंदा तर गत आठ महिन्यांपासून कामगारांचा पगारच झाला नाही. दर महिन्याला संघटनेच्यावतीने वेतनासाठी निवेदन दिले जाते. परंतु त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे कामगारात असंतोष पसरला आहे. आठ महिन्यांपासून पगार नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुकानदारही कामगारांना उधारीवर किराणा देण्यास तयार नाही. मुलांच्या शाळा शुल्काचे पैसेही थकीत आहे. आजार पणासाठीही रक्कम नसते. अशा स्थितीत कर्जाचा डोंगर कामगारांवर वाढत आहे. कामगारांच्या परिस्थिती माहिती कारखाना प्रशासनाला माहीत व्हावी म्हणून संघटनेचे पी.के. मुडे, व्ही.एम. पतंगराव यांनी कारखाना अध्यक्षांची भेट घेतली. थकीत पगार व इतर २२ मागण्या त्वरित सोडविण्याची मागणी केली. परंतु अध्यक्षांनी कुठलीही दखल घेतली नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे मंगळवारी शेकडो कामगार कारखान्याच्या मुख्य कार्यालयावर धडकले. यावेळी कामगारांनी प्रशासनाच्या विरोधात गगणभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. पोलिसांनीही तगडा बंदोबस्त ठेवला होता.
मोर्चा कारखान्यावर आला असता कामगारांचे निवेदन घेण्यासाठी अध्यक्षांसह कुणीही संचालक हजर नव्हते. त्यामुळे कामगारात तीव्र असंतोष पसरला. (शहर प्रतिनिधी)