‘वसंत’च्या कामगारांनी अडविले साखरेचे ट्रक

By admin | Published: November 11, 2015 01:52 AM2015-11-11T01:52:42+5:302015-11-11T01:52:42+5:30

थकीत वेतनासाठी आंदोलन करणाऱ्या वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी साखर नेण्यासाठी आलेले ट्रक अडवून आपला रोष व्यक्त केला.

The workers of 'Vasant' band blocked the truck | ‘वसंत’च्या कामगारांनी अडविले साखरेचे ट्रक

‘वसंत’च्या कामगारांनी अडविले साखरेचे ट्रक

Next

वेतन-बोनस नाही : प्रशासन आणि कामगारांत तणाव वाढला
उमरखेड : थकीत वेतनासाठी आंदोलन करणाऱ्या वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी साखर नेण्यासाठी आलेले ट्रक अडवून आपला रोष व्यक्त केला. दिवाळीच्या तोंडावरही कारखाना प्रशासन वेतन देत नसल्याने कामगार चांगलेच संतप्त झाले आहे. यातून कारखाना प्रशासन आणि कामगारात तणाव वाढला आहे.
वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना गत १३ महिन्यांपासून पगार मिळाला नाही. वारंवार आंदोलने करूनही प्रशासन उपाययोजना करीत नाही. त्यामुळे ६ नोव्हेंबरपासून कामगारांनी कारखान्याच्या गेटसमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. परंतु अध्यक्षांसह संचालक मंडळाने दखल घेतली नाही. त्यातच कारखान्याने विकलेली साखर नेण्यासाठी मंगळवारी आठ ते दहा ट्रक कारखाना परिसरात आले. कामगारांना हा प्रकार माहीत होताच त्यांनी सर्व ट्रक अडविले. एकाही ट्रकला कारखान्याच्या आत प्रवेश करु दिला नाही. काही वेळातच हे सर्व ट्रक परत गेले. विशेष म्हणजे या कारखान्यात एक लाख २२ हजार साखरेच्या गोण्या शिल्लक आहे. त्यातील २५ हजार पोती साखर कारखान्याने विकली आणि तीच साखर नेण्यासाठी मंगळवारी ट्रक आले होते. परंतु कामगारांच्या रौद्ररुपापुढे कुणाचेही काहीच चालले नाही.
गळीत हंगाम अद्याप सुरू झाला नाही. त्यातच कामगारांंना १३ महिन्यांपासून पगार नाही. यापूर्वी सतत २८ दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर उमरखेडमध्ये भीक मागो आंदोलनही करण्यात आले. संचालक मंडळाने दोन महिन्याचे वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर तीन महिने झाले तरी एकाही कामगाराचा पगार दिला नाही. या दरम्यान अनेकदा निवेदने दिली. परंतु उपयोग झाला नसल्याने ६ नोव्हेंबरपासून कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले. या उपोषणाला खासदार अ‍ॅड. राजीव सातव, आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर, माजी आमदार विजय खडसे, तातू देशमुख, अ‍ॅड. माधवराव माने, भीमराव पाटील, विलास चव्हाण आदींनी भेट देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कामगारांचा तीव्र रोष कारखाना अध्यक्ष व संचालक मंडळावर दिसून आला. जोपर्यंत वेतन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर ऊस उत्पादक राम देवसरकर, रमेश चव्हाण, डॉ.वि.ना. कदम यांनी कामगारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु कामगार वेतनावरच ठाम आहे. दिवाळी सण आला तरी अद्याप वेतन मिळाले नसल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The workers of 'Vasant' band blocked the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.