‘वसंत’वर कामगार धडकले
By admin | Published: January 6, 2016 03:09 AM2016-01-06T03:09:30+5:302016-01-06T03:09:30+5:30
थकीत वेतनाच्या मागणीसाठी पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचे शेकडो कामगार मंगळवारी दुपारी १२ वाजता कारखान्यावर धडकले.
थकीत वेतन : अध्यक्ष, संचालक मंडळ व कामगारांत तणाव
उमरखेड : थकीत वेतनाच्या मागणीसाठी पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचे शेकडो कामगार मंगळवारी दुपारी १२ वाजता कारखान्यावर धडकले. कामगार संघटना आणि संचालक मंडळात कारखाना सुरू करण्याची तयारी असताना या मोर्चाने वातावरण ताणले गेले आहे.
वसंत साखर कारखान्याच्या कामगारांचे १२ महिन्यांपासून वेतन थकीत आहे. त्यामुळे कामगारांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने पगार दिला नाही. यासोबतच हंगामी कायम कामगारांच्या हक्काच्या सुट्यांचा पगार, बोनस, सानुग्रह अनुदानाची रक्कम आदी मागण्या प्रलंबित आहेत. कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर आणि संचालक मंडळ कामगारांच्या पगारावर काहीही बोलायला तयार नाही. पगार देण्यास हेतुपुरस्सर टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे शेकडो कामगार संतप्त झाले.
कामगारांनी संघटनेचे अध्यक्ष पी.के. मुडे, व्ही.एन. पतंगराव यांच्या नेतृत्वात मंगळवारी मोर्चा काढला. काही दिवसात गाळप सुरू होणार होते. परंतु मंगळवारी निघालेल्या मोर्चाने पुन्हा एकदा कारखाना प्रशासन आणि कामगारात तणाव वाढला आहे. गाळपाच्या सुरूवातीलाच आंदोलन सुरू झाल्याने ‘वसंत’चे अस्तित्व धोक्यात आले आहे. महिनाभरापूर्वी बॉलर प्रज्वलन झाल्यानंतरही अद्याप गाळपाला सुरूवात झाली नाही. त्यातच कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. (शहर प्रतिनिधी)
वसंत साखर कारखाना सुरू होऊ नये यासाठी विरोधक प्रयत्न करीत आहे. त्यात कामगार संघटना विरोधी नेत्यांसोबत संगणमत करून मला हेतुपुरस्सर बदनाम करीत आहे. कामगारांच्या मागण्या आर्थिक अडचणी असल्यामुळे पूर्ण करू शकलो नाही. मला कारखाना, ऊस उत्पादक आणि कामगारांच्या हितासाठी सुरू करायचा आहे. परंतु कामगारांकडून कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न होत आहे.
- प्रकाश पाटील देवसरकर,
अध्यक्ष वसंत साखर कारखाना.
वसंत साखर कारखाना प्रशासन कामगारांना हेतुपुरस्सर त्रास देत आहे. पगार दिले जात नाही. कारखाना अध्यक्ष आणि संचालक मंडळालाच कारखाना सुरू करायचा नाही. येत्या १० दिवसात कामगारांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडणार आहोत.
- पी.के. मुडे,
अध्यक्ष कामगार संघटना