२९ वर्षांत तब्बल ६२ वेळा प्रभारावर कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:45 AM2021-09-26T04:45:52+5:302021-09-26T04:45:52+5:30
ज्ञानेश्वर ठाकरे महागाव : २९ वर्षांपूर्वी १९९६ मध्ये महागावला तालुक्याचा दर्जा मिळाला. त्यामुळे प्रशासकीय कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा ...
ज्ञानेश्वर ठाकरे
महागाव : २९ वर्षांपूर्वी १९९६ मध्ये महागावला तालुक्याचा दर्जा मिळाला. त्यामुळे प्रशासकीय कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या २९ वर्षांत तब्बल ६२ वेळा प्रभारींवर कामकाज चालविण्यात आल्याने अद्यापही तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात विकास साधता आला नाही.
तालुक्याचे पालकत्व असणाऱ्या तहसीलदारांच्या प्रभाराने तालुका मागासला आहे. तालुका निर्मितीच्या कार्यकाळापासून गेल्या २९ वर्षांत तब्बल ६२ वेळा तहसील कार्यालयाचा कार्यभार प्रभारावर राहिला. सद्य:स्थितीतसुद्धा तहसीलदार प्रभारीच आहे. १६ फेब्रुवारी १९९६ ते २६ सप्टेंबर २०२१ पर्यंत प्रभारी पदाचा धांडोळा घेतला असता तब्बल ६२ प्रभारी तहसीलदारांनी येथील तहसीलचे कामकाज पाहिल्याचे दिसून आले.
आतापर्यंत अनेकांना बरेचदा प्रभार मिळाला. नुकताच १४ ऑगस्ट २०२१ रोजी नायब तहसीलदार विश्वंभर राणे यांनी प्रभार स्वीकारला. मागील २७ वर्षांच्या कार्यकाळातील ते येथील ६२ वे प्रभारी तहसीलदार ठरले आहेत. त्यांच्या आधी नुकतेच महागाव येथून बदलून गेलेले नामदेव इसलकर हेसुद्धा प्रभारीच होते. तहसीलदार एम.एस. तामगडेनंतर आलेल्या तहसीलदारांना येथे पूर्ण कार्यकाळ सेवा देण्याची संधीच लाभली नाही. तामगडे यांनी सर्वाधिक चार वर्षे तहसीलचा कार्यभार पाहिल्याची नोंद तक्त्यावर नमूद आहे.
सततच्या प्रभारी कामकाजामुळे तालुक्यात विविध समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. शिवाय अवैध रेती उपसा, माती, मुरूम, दगड यासह ई-क्लास जमिनीवर असलेल्या मौल्यवान सागवान वृक्षांची मोठ्या प्रमाणात कटाई झाली आहे. त्यामुळे महागाव तालुक्याचा प्रभारी कार्यभार काढून श्रेणी एक असलेल्या त्याच अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी जनभावना आहे.
बॉक्स
नगरपंचायतीलाही वाली नाही
येथे नव्यानेच नगरपंचायतीची स्थापना झाली. मात्र, नगरपंचायतीलाही पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांचे वावडे दिसून येत आहे. मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांची नुकतीच येथून बदली झाली. त्यामुळे येथील कार्यभारसुद्धा प्रभारावरच आहे. परिणामी तालुक्यासह शहरात विकासकामांचा खेळखंडोबा होत आहे.