बेरोजगारांच्या मार्गदर्शनासाठी एसपींच्या पुढाकारात कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 10:16 PM2018-03-14T22:16:59+5:302018-03-14T22:17:07+5:30
शहरातील वाढत्या गुन्हेगारीला बेरोजगार युवकांची फळी कारणीभूत आहे. त्यांच्या हाताला काम दिल्यास गुन्ह्याचे प्रमाण कमी होऊ शकते, .....
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला बेरोजगार युवकांची फळी कारणीभूत आहे. त्यांच्या हाताला काम दिल्यास गुन्ह्याचे प्रमाण कमी होऊ शकते, यासाठी खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राज कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हा उद्योग केंद्र, सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयातून यवतमाळात प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
युवकाच्या हाता काम दिल्यानंतर त्याचा गुन्हेगारी क्षेत्रातील ओढा कमी करता येऊ शकतो. पोलिसांनी फौजदारी कायदाचा आधार घेऊन प्रतिबंधकात्मक कारवाई केल्यानंतर एका मर्यादेपर्यंत गुन्हेगारावर वचक निर्माण करता येतो. याऊलट गुन्हेगारी क्षेत्रात येणाऱ्या युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणे रामबाण औषध आहे. बेरोजगारात उद्योजकता विकसित केल्यास ते गुन्हेगारी क्षेत्रापासून परावृत्त होतील, यासाठी जिल्हा पोलीसांनीच पुढाकार घेतला आहे. गुरूवारी सायंकाळी सेंट सामाजिक उत्थान संस्थेच्या कार्यालयात रोजगार मार्गदर्शन कार्याशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेत जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एस.एस. मुत्तेमवार, प्रशिक्षण संस्थेचे संचालक एस.बी. मिटकरी, सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे समन्वय अधिकारी कुमरे उपस्थित होते. कार्यशाळेत शासनाच्या विविध स्वयंरोजगार योजना, अर्थसहाय, मोफत निवासी प्रशिक्षण यावर मार्गदर्शन केले. युवकांनी परिस्थितीला दोष न देता स्वत:चे कौशल्य विकसित करून स्वयंरोजगार निर्माण करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी केले.