उमरखेडमध्ये जागतिक व्यंगचित्रकार दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:44 AM2021-05-06T04:44:28+5:302021-05-06T04:44:28+5:30
उमरखेड : व्यंगचित्रकार हा शब्दांतून बोलणारा आणि चित्रातून सांगणारा कलावंत असतो. त्याला रेषांतून काही सुचवायचे असते. सूचकता हे कोणत्याही ...
उमरखेड : व्यंगचित्रकार हा शब्दांतून बोलणारा आणि चित्रातून सांगणारा कलावंत असतो. त्याला रेषांतून काही सुचवायचे असते. सूचकता हे कोणत्याही कलेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असते. कमीत कमी शब्द आणि रेषांच्या आधारे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे सत्य समाजापुढे मांडण्याचे कार्य व्यंगचित्र करते, असे मत व्यंगचित्रकार प्रभाकर दिघेवार यांनी व्यक्त केले.
येथे जागतिक व्यंगचित्रकार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यंगचित्रात मांडलेल्या कल्पनेतूनही वाचकाला चंद्र, सूर्यापर्यंत पोहोचण्याची ताकद मिळते. व्यंगचित्र ही कला आहे. ती आत्मसात करणे आणि तिची जोपासना करणे, या दोन्ही गोष्टी कष्टसाध्य आहेत. याच्या शिक्षणाचे धडे कोणत्याही शाळा, कॉलेजातून दिले जात नाही. त्यामुळे भाराभर व्यंगचित्रकार निर्माण होत नाहीत. यात मराठी व्यंगचित्रकारांची संख्या जेमतेम ७० ते ८० च्या दरम्यान आहे. त्यांना प्रोत्साहन व व्यासपीठ मिळत नाही. त्यामुळे व्यंगचित्रकार पूर्णवेळ पेशा बनविणे कठीण होऊन बसले आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
ही कला अबाधित राहण्यासाठी व्यंगचित्रकारांना व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. ॲनिमेशन, राजकीय व्यंगचित्र, सामाजिक आशयांची व्यंगचित्रे हे व्यंगचित्राचे इतर पैलू. त्यातही राजकीय व्यंगचित्रकारांचा समाजावरील प्रभाव जादा असतो. सामाजिक आशयांच्या व्यंगचित्रातून ज्वलंत सामाजिक विषयावर अनेक व्यंगचित्रकार जनजागृती करतात. व्यंगचित्र आणि वाचकांचे नाते शतकानुशतके आहे. पानभर लेख लिहून जो परिणाम होत नाही, तो एका व्यंगचित्राने साधल्याची अनेक उदाहरणे आहे.
जगभर ५ मे रोजी ‘व्यंगचित्र दिन’ साजरा केला जातो. १८९५ मध्ये याच दिवशी जोसेफ पुलित्झर यांच्या न्यूयॉर्क वर्ल्डमध्ये हास्य आणि व्यंग यांची उधळण असलेल्या ‘द यलो कीड’ या काॅमिक्सचे प्रकाशन झाले होते. निर्माते होते रिचर्ड एफ. आऊटकल्ट. द येलो किडला वर्तमान युगातील व्यंगचित्रांचा प्रारंभ मानला जातो.
बॉक्स
केवळ विनोदीच नव्हे, तर प्रबोधनात्मक
व्यंगचित्र विनोदीच असते असे नव्हे, तर ते मार्मिक, प्रबोधनात्मक, बोचरेसुद्धा असते. मराठी व्यंगचित्र कला क्षेत्रात बाळासाहेब ठाकरे, सि. द. फडणीस, वसंत सरवटे, वसंत हळबे, प्रभाकर ठोकळ, मंगेश तेंडुलकर, विकास सबनीस, आदी अनेक नामवंत व्यंगचित्रकार मंडळी वेगवेगळ्या शैलींत वाचकांना हसवत व अंतर्मुख करीत. त्यांचा वारसा पुढे जपण्याची आजची व्यंगचित्रकार मंडळी प्रयत्न करीत आहेत.