काळजाचं पाणी पाणी! राज्याच्या काही भागांत पूर तर अनेक जिल्हे कोरडेच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 05:42 AM2023-07-23T05:42:54+5:302023-07-23T05:43:19+5:30
यवतमाळ/अकोला : शुक्रवारी रात्रीपासून पश्चिम विदर्भात ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे यवतमाळ , बुलढाणा व अकोला जिल्ह्याच्या काही भागात हाहाकार माजला आहे. ...
यवतमाळ/अकोला : शुक्रवारी रात्रीपासून पश्चिम विदर्भात ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे यवतमाळ, बुलढाणा व अकोला जिल्ह्याच्या काही भागात हाहाकार माजला आहे. ठिकठिकाणी नद्या फुगून महापुराने गावांना वेढा घातला. त्यामुळे घरांमध्ये पाणी शिरले. तर हजारो हेक्टरवरील पिके खरडून निघाली. यवतमाळ जिल्ह्यातील अनंतवाडी (ता. महागाव) येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी हेलिकॉप्टर आणण्यात आले. अमरावती आणि मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यांनाही पूरपरिस्थितीचा फटका बसला आहे.
शुक्रवारी रात्रीपासून पश्चिम विदर्भात जोरदार पाऊस झाला. नद्या आणि नाल्यांचे पाणी वस्त्यांमध्ये शिरल्याने भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली. यवतमाळ जिल्ह्याच्या विविध भागांत १५० हून अधिक लोक पुरात अडकले होते. अनंतवाडी (ता. महागाव) येथे अडकलेल्या ४५ जणांना बाहेर काढण्यासाठी हवाई दलाचे हेलिकॉप्टर पाचारण करण्यात आले होते. मात्र, एसडीआरएफ पथकाने स्थानिकांच्या मदतीने या नागरिकांना बाहेर काढले.
हेलिकॉप्टर आले, पण उतरू शकले नाही
आनंदनगरात (ता. महागाव) अडकलेल्यांना काढण्यासाठी हेलिकॉप्टर आले, पण लँड करण्यासाठी योग्य जागाच मिळाली नसल्याने ते अनंतवाडीऐवजी खडका गावात उतरविण्यात आले. काही वेळानंतर हेलिकाॅप्टर आनंदनगरच्या वस्तीवर आले. मात्र, खराब हवामानामुळे मदतकार्य होऊ शकले नाही. त्यामुळे बराच वेळ ते केवळ घिरट्या घालत राहिले. एनडीआरएफच्या पथकाने बोटीद्वारेच अनेकांना बाहेर काढले.
बुलढाणा : १५० अडकले
जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामाेद तालुक्यांत पुराचे पाणी शेतात शिरले. काथरगाव पिंप्री येथील १५० नागरिक पुरात अडकले होते. अनेक गावांचा संपर्क तुटला.
नांदेड : पैनगंगा पात्राबाहेर
जिल्ह्यात १३ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. पैनगंगा नदी पात्र सोडून वाहत असल्याने पूरपरिस्थिती. किनवटमध्ये पाणी शिरल्याने ८० जणांचे उर्दू शाळेत स्थलांतर.
अमरावती : तिघे गेले वाहून
मोर्शी तालुक्यात महिला, चांदूरबाजार व धामणगाव तालुक्यात २ युवक वाहून गेले. १५,६०० हेक्टरवर पिकांचे नुकसान.
अकाेला : युवक गेला वाहून
तेल्हारा व अकोट तालुक्यांत अतिवृष्टीचा फटका बसला. पाथर्डीत युवक वाहून गेला.
यवतमाळ : दोघांचा मृत्यू
वाघाडीमध्ये अंगावर घर पडून महिलेचा तर सावर (ता. बाभूळगाव) येथे पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला. वाशिममध्ये १२ गावांना पुराने वेढा दिला.
पती, मुलींना वाचविले, पण तिच्यावर घर कोसळले
वाघाडीत रात्री पूर आल्यामुळे पत्नीने पतीला जागे करून मुलींना त्यांच्याजवळ दिले. ते सर्व बाहेर पडले परंतु मुलींची आई घरातच अडकली. घर जमीनदोस्त झाले व आई शालू रवींद्र कांबळे (३५) हिचा मृत्यू झाला.
या जिल्ह्यात विश्रांती
विदर्भात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली. मराठवाड्यात नांदेड वगळता इतर जिल्ह्यांत शनिवारी विशेष पाऊस नव्हता. पश्चिम महाराष्ट्रात सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या काही भाग तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात पावसाची विश्रांती आहे.