अज्ञातांनी सव्वा लाखाचा कापूस पळविला, नांदेपेरा शिवारातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 05:09 PM2021-12-05T17:09:46+5:302021-12-05T17:15:57+5:30
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी शेतात प्रवेश केला व बंड्याचे कुलूप तोडून ४० क्विंटलपैकी तब्बल १५ क्विंटल कापूस लंपास केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नांदेपेरा येथून एक किलोमीटर अंतरावर असेलल्या पोहणा शिवारातील एका शेतकऱ्याच्या बंड्यातून अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री तब्बल सव्वा लाख रुपयांचा कापूस पळविला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी रविवारी वणी पोलीस ठाण्यात शेतकऱ्याने लेखी तक्रार दाखल केली.
लगतच्या पोहणा शेतशिवारात रवी उर्फ प्रवीण जयस्वाल यांचे वणी-नांदेपेरा मार्गावर शेत आहे. या शेतात त्यांनी कपाशीचे पीक घेतले आहे. कपाशीची वेचणी केल्यानंतर ताे कापूस शेतातील बंड्यामध्ये साठवून ठेवला होता. दरम्यान, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी या शेतात प्रवेश केला व बंड्याचे कुलूप तोडून ४० क्विंटलपैकी तब्बल १५ क्विंटल कापूस लंपास केला.
या शेताजवळ एका चारचाकी मालवाहू वाहनाच्या खुणा आढळल्या असून, त्यातच हा कापूस भरून नेल्याची शंका शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. चोरट्यांनी जवळपास सव्वा लाख रुपये किमतीचा कापूस लंपास केला. रविवारी सकाळी शेतमजूर शेतात गेले असता, ही घटना उघडकीस आली.
याप्रकरणी शेतमालक रवी जयस्वाल यांनी वणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी टिपर्णे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या परिसरात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असून, यापूर्वीही शेतातील अनेक शेतीसाहित्यचोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या चाेरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.