यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वरमधून जखमी वाघ बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 08:23 PM2018-02-05T20:23:34+5:302018-02-05T20:25:36+5:30
सुमारे दीड वर्षांपूर्वी पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात वन्यप्राण्यांसाठी लावलेल्या सापळ्याचा तार वाघाच्या गळ्यात अडकल्यामुळे वाघाच्या गळ्याला गंभीर जखम झाली. अनेक प्रयत्न करूनही वाघाच्या गळ्यातील हा तार काढण्यात वन विभागाला यश आले नाही. आता गेल्या चार महिन्यांपासून हा जखमी वाघच अभयारण्यातून बेपत्ता झाल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
संतोष कुंडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सुमारे दीड वर्षांपूर्वी पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात वन्यप्राण्यांसाठी लावलेल्या सापळ्याचा तार वाघाच्या गळ्यात अडकल्यामुळे वाघाच्या गळ्याला गंभीर जखम झाली. अनेक प्रयत्न करूनही वाघाच्या गळ्यातील हा तार काढण्यात वन विभागाला यश आले नाही. आता गेल्या चार महिन्यांपासून हा जखमी वाघच अभयारण्यातून बेपत्ता झाल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
२०१६ च्या सप्टेंबर महिन्यात हा वाघ गळ्यात सापळ्याचा तार अडकून असलेल्या अवस्थेत सर्वप्रथम एका वन कर्मचाऱ्याला दिसला होता. मात्र त्यावेळी त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर २०१७ च्या मार्च महिन्यात टिपेश्वर अभयारण्य प्रशासनातील एका बड्या अधिकाऱ्याला सदर वाघ नजरेस पडला. त्यावेळीदेखील त्याच्या गळ्याला तार अडकून होता. त्यावेळी त्या वाघाचे फोटोदेखील काढण्यात आले. त्यात गळ्याला झालेली जखमी स्पष्ट दिसत होती.
नागपूरच्या पथकाचा दोनदा सर्च
नागपूरच्या वरिष्ठ वन्यजीव अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. लगेच नागपूरवरून डॉ.बहार यांच्या नेतृत्वात ट्रॅन्क्युलाईज पथक दाखल झाले. अभयारण्यातील हापशी पॉइंट परिसरात तो वाघ जखमी अवस्थेत भटकत असल्याचे पथकाला आढळले. ही चमू आठवडाभर अभयारण्यात तळ ठोकून होती. मात्र वाघाला बेशुद्ध करून त्याच्या गळ्यातील तार काढण्यात चमूला यश आले नाही. ही चमू नागपुरात पोहोचत नाही तोच हा जखमी वाघ पुन्हा त्याच परिसरात दिसला. त्यामुळे चमूला पुन्हा पाचारण करण्यात आले. परंतु पुढचे आठ दिवस पुन्हा त्या वाघाचा मागमूस लागला नाही.
दरम्यान २०१७ अखेरीस अभयारण्यात अनेकांनी या वाघाला पाहिले. माथनी परिसरात याच वाघाने एका गाईवर हल्ला करून तिची शिकार केली. ही बाब कळताच शिकारीच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले. या कॅमेºयात जखमी वाघ कैद झाला. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी त्याच ठिकाणी पिंजरा लावण्यात आला. मात्र त्यात तो अडकला नाही. त्यानंतर २०१७ च्या नोव्हेंबरमध्ये तो अभयारण्याबाहेर म्हणजे घाटंजी तालुक्यातील इंझाळा जंगलात दिसला. जवळपास तीन दिवस या वाघाने तेथे दर्शन दिले. तेव्हापासून तो बेपत्ता आहे.
डीएफओंच्या बैठकांमध्ये चर्चा
यासंदर्भात तत्कालिन डीएफओ (वन्यजीव) राठोड व डीएफओ (प्रादेशिक) के. अभर्णा यांच्यात बैठकही झाली होती. मात्र या बैठकीतून काहीच निष्पन्न झाले नाही. जखमी वाघाच्या गळ्यातील फास काढण्याबाबत अभयारण्य प्रशासन फारसे उत्सुक नव्हते. परिणामी सदर जखमी वाघ आता कुठे आहे, तो जीवंत आहे, की त्याच्या जिवाला काही बरे वाईट झाले, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास वनविभाग हतबल ठरला आहे.
आगीमुळे अनेक वाघ अभयारण्याबाहेर
सन २०१६ मध्ये टिपेश्वर अभयारण्यात भीषण आग लागली होती. या आगीमुळे वाघासह अनेक वन्यप्राणी जंगलाबाहेर पडले. या घटनेनंतर तीन वाघ अजुनही अभयारण्याबाहेरच आहेत. त्यातील एक राळेगाव तालुक्यात, एक वणी तालुक्यातील घोन्सा जंगलात तर एक झरीच्या जंगलात भटकत आहे.
वाघाच्या गळ्यात फास अडकला होता, हे खरे आहे. त्याला पकडण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. मात्र तो सापडला नाही. सद्यस्थितीत तो कुठे आहे, याबाबत निश्चित सांगता येणार नाही.
- अमर सिडाम,
आरएफओ, टिपेश्वर अभयारण्य