शरच्चंद्र टोंगो यांचे लिखाण शाश्वत स्वरूपाचे
By admin | Published: March 2, 2015 02:06 AM2015-03-02T02:06:46+5:302015-03-02T02:06:46+5:30
शरच्चंद्र टोंगो हे उत्कृष्ट साहित्यिक, लेखक आणि पत्रकार होते. विचारांनी लिहिणाऱ्या जुन्या-जाणत्या मंडळीत ते अग्रणी होते. त्यांनी केलेले लिखाण हे शाश्वत स्वरूपाचे आहे.
यवतमाळ : शरच्चंद्र टोंगो हे उत्कृष्ट साहित्यिक, लेखक आणि पत्रकार होते. विचारांनी लिहिणाऱ्या जुन्या-जाणत्या मंडळीत ते अग्रणी होते. त्यांनी केलेले लिखाण हे शाश्वत स्वरूपाचे आहे. त्यांच्या विचारांची प्रेरणा नवीन पिढीला मिळावी यासाठी त्यांच्या विचाराचे कायमस्वरूपी जतन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी येथे केले.
सुविख्यात कादंबरीकार, कथा लेखक शरच्चंद्र टोंगो यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचे उद्घाटन रविवारी येथील लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात झाले. त्याप्रसंगी खासदार विजय दर्डा अध्यक्षस्थानाहून बोलत होते. या महोत्सवाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी विभाग प्रमुख आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक पद्मश्री डॉ.यू.म. पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर येथील अॅड. के.एच. देशपांडे, प्राचार्य डॉ. उत्तम रुद्रवार, प्रा.डॉ. गोविंद देशपांडे उपस्थित होते.
यावेळी विजय दर्डा म्हणाले, स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजींचे वृत्तपत्र ‘नवे जग’ असो की साप्ताहिक लोकमत, शरच्चंद्र टोंगो यांच्या भरीव सहकार्याने ते विकसित झाले. बाबूजींचे आणि त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. अमोलकचंद महाविद्यालयात टोंगो सरांनी मला शिकविले. त्यामुळे ते माझेही गुरु आणि मार्गदर्शक होते. ज्यांच्या नावामध्येच साहित्य रंग आहे, देखणेपण आहे, उत्साह, उमंग आणि विचार आहेत असे शरच्चंद्र टोंगो उत्कृष्ट साहित्यिक, लेखक आणि पत्रकार होते.
शरच्चंद्र टोंगो यांच्या व्यक्तीमत्वाचे पैलू भागात विभागता येतील. पहिले म्हणजे साहित्यिक शरच्चंद्र टोंगो हे असे साहित्यिक आहे की त्यांनी लिहिलेला प्रत्येक शब्द छापण्यात आला आहे. दुसरे म्हणजे त्यांना स्वातंत्र्य संग्रामाचा वारसाही लाभला आहे. गरीबी आणि संकटे झेलूनही अत्यंत विनम्र असे ते साहित्यिक होते. तिसरा पैलू म्हणजे पत्रकारिता होय. नवे जग, अर्ध साप्ताहिक लोकमत, साप्ताहिक लोकमत, सोनाली मासिक आदी वृत्तपत्र मासिकातून त्यांनी केलेले लिखाण उच्च दर्जाचे आहे. टोंगो सर परदेशात असते तर त्यांचा उदोउदो झाला असता. त्यांना साहित्यिकांनी आणि समाजानेही डोक्यावर घेतले असते, असे ते म्हणाले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)