मेडिकलचा एक्स-रे विभाग तज्ज्ञांविना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 09:10 PM2019-05-30T21:10:18+5:302019-05-30T21:10:55+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराच्या आशेने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. मात्र येथील अनेक विभागात आलेल्या रुग्णांचा भ्रमनिरास होतो. बुधवारी एक्स-रे विभागासमोर रुग्णांची मोठी रांग लागली होती. मात्र या विभागात तंत्रज्ज्ञ नसल्याने बंद ठेवण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराच्या आशेने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. मात्र येथील अनेक विभागात आलेल्या रुग्णांचा भ्रमनिरास होतो. बुधवारी एक्स-रे विभागासमोर रुग्णांची मोठी रांग लागली होती. मात्र या विभागात तंत्रज्ज्ञ नसल्याने बंद ठेवण्यात आला होता.
अशीच अवस्था रुग्णालयातील सोनोग्राफी विभागाची आहे. येथेसुद्धा रांगाच रांगा लागलेल्या असतात. गरीब रुग्णांना ताटकळत बसावे लागते. इसीजी करण्यासाठीसुद्धा पुरेशी साधने उपलब्ध नाही. एकाच तंत्रज्ज्ञाकडून इसीजी काढण्याचे काम केले जाते. त्यामुळे या कक्षात सदैव मोठी गर्दी असते. इसीजी करेपर्यंत बाह्य तपासणी विभागाचा वेळ संपून जातो. त्यामुळे नेमका काय बदल झाला हे विचारण्यासाठी डॉक्टर्स उपलब्ध होत नाही. दुसऱ्या दिवशी इसीजी घेऊन आल्यानंतर यूनीट बदलल्याने पूर्वी उपचार केलेले डॉक्टर मिळत नाही. यामुळे उपचाराची लिंक लागत नाही. याचा फटका गरीब रुग्णांना सहन करावा लागतो. तसेच रुग्णालयातील क्ष-किरण विभाग काही दिवसांपासून बंद आहे. याबाबत गुरुदेव युवा संघटनेचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी तक्रार केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. रुग्णालयातील पॅथॉलॉजी विभागातही सावळा गोंधळ आहे. तेथील अनेक महत्त्वपूर्ण तपासण्यांचे मशनरीज बंद आहे. खासगीतून तपासणी करून घ्यावी लागत आहे.