भूखंड घोटाळ्यात एलआयसी चौकातील झेरॉक्स सेंटर सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 10:31 PM2018-08-20T22:31:00+5:302018-08-20T22:32:24+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या समोरील पेशीनंतर गतिमान झालेल्या ‘एसआयटी’ने कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्यातील सातव्या आरोपीला रविवारी रात्री अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या समोरील पेशीनंतर गतिमान झालेल्या ‘एसआयटी’ने कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्यातील सातव्या आरोपीला रविवारी रात्री अटक केली. दरम्यान पोलिसांनी सोमवारी एलआयसी चौकातील झेरॉक्स सेंटरला सील लावले. तेथे घोटाळ्यातील बनावट कागदपत्रे तयार झाल्याचा संशय आहे.
शिवा तिवारी असे या आरोपीचे नाव आहे. तो बाभूळगाव पंचायत समितीमध्ये कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे. सोमवारी न्यायालयात उपस्थित केले असता त्याला २३ आॅगस्टपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विशेष असे शिवाच्या सहभागाचे भाकित ‘लोकमत’ने तीन आठवड्यांपूर्वीच वर्तविले होते, ते त्याच्या अटकेने तंतोतंत खरे ठरले. भूखंड घोटाळ्यात आतापर्यंत सात गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एक गुन्हा २०१६ मध्ये नोंदविला गेला होता. या गुन्ह्यांमध्ये ‘एसआयटी’ने आतापर्यंत आरिफ अली, डॉ. अमोल मुजमुले, नीलेश बानोरे, नीलेश उनाडकर, लतेश चमेडिया, अर्जनवीस प्रकाश विठाळे यांना अटक केली. लतेशच्या अटकेपूर्वी ‘एसआयटी’च्या एका अधिकाऱ्याने सुमारे दोन तास राजकीय मार्गदर्शन घेतल्याचे बोलले जाते. पोलिसांनी न्यायालय रोडवरील प्रवीण झेरॉक्स सेंटर सील केल्यानंतर लतेश व प्रकाशच्या घराची झडती घेतली.आरोपींचे हस्ताक्षर नमुनेही घेण्यात आले आहे. सोमवारी एलआयसी चौकातील जयस्वाल यांचे साई झेरॉक्स सेंटर सील करण्यात आले. दाखल झालेल्या सात पैकी चार गुन्ह्यांमध्ये राकेश यादव व मंगेश पन्हाळकर हे आरोपी आहेत. तेच सध्या तरी या प्रकरणात सूत्रधार आहेत. त्यांच्या अटकेचे आव्हान ‘एसआयटी’पुढे आहे.