यशश्रीला राज्य कुस्ती स्पर्धेत सुवर्ण
By admin | Published: January 25, 2017 12:34 AM2017-01-25T00:34:37+5:302017-01-25T00:34:37+5:30
येथील ऐतिहासिक श्री हनुमान आखाड्याच्या महिला मल्लांनी पुणे येथील आळंदी शहरात झालेल्या महाराष्ट्र राज्य महिला कुस्ती
हनुमान आखाड्यातर्फे गौरव : महिमाची रौप्य पदकाला गवसणी
यवतमाळ : येथील ऐतिहासिक श्री हनुमान आखाड्याच्या महिला मल्लांनी पुणे येथील आळंदी शहरात झालेल्या महाराष्ट्र राज्य महिला कुस्ती स्पर्धेत एक सुवर्ण, एक रजत अशा दोन पदकांची चमकदार कामगिरी केली. यशश्री खडसे हिने ५३ किलो वजनगटात फ्री स्टाईल कुस्तीत सुवर्ण पदक, तर महिमा राठोड हिने रौप्य पदक पटकावून जिल्ह्याचा गौरव वाढविला.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्यावतीने ही स्पर्धा घेण्यात आली. यात राज्यातील ३६ जिल्ह्यातील ४२ संघांनी सहभाग घेतला होता. यवतमाळ जिल्हा कुस्तीगिर संघ तथा श्री हनुमान आखाड्याच्या यशश्री वसंत खडसे, ममता हरिश्चंद्र बालवे, दिव्या ज्ञानदेव खेकडे, महिमा राजू राठोड या मल्लांनी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.
यशश्री खडसे हिने ४३ किलो फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत यजमान आळंदीच्या स्पर्धकाचा सहा विरुद्ध दोन गुणांनी चितपट कुस्तीद्वारे दिमाखदार विजय संपादन करून सुवर्ण जिंकले. यशश्रीने यापूर्वी अनेक राष्ट्रीय व विद्यापीठस्तरीय स्पर्धा गाजविल्या आहेत. महिमा राठोड हिने ४३ किलो ज्युनिअर गटात रजत पदक जिंकले.
जिल्हा कुस्तीगिर संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, सचिव अनिल पांडे यांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी सर्व महिला मल्लांचा हनुमान आखाड्यात गौरव करण्यात आला. यावेळी प्रताप पारस्कर, नरेंद्र बुटके, प्रभाकर गटलेवार, सुरेश जयसिंगपुरे, दीपक ठाकूर, विठ्ठल भोयर, अनिल लाखकर, विशाल आकोलकर, उद्धव बाकडे, किसन दवारे, पवन पांडे, अमित बागडे, सागर खोब्रागडे, वसंत खडसे, रामेश्वर यादव आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)