यवतमाळ येथे काटा कुस्त्यांची दंगल; जवाहरलाल दर्डा स्मृती आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 10:35 AM2018-11-27T10:35:08+5:302018-11-27T10:35:39+5:30

स्वातंत्र्य संग्राम सेनानी व  लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे रविवारी दहा लाख रुपयांच्या इनामी काटा कुस्त्यांच्या विराट दंगलीचे आयोजन करण्यात आले होते.

Yatmala's wrestling competitions; Organizing Jawaharlal Darda Memorial | यवतमाळ येथे काटा कुस्त्यांची दंगल; जवाहरलाल दर्डा स्मृती आयोजन

यवतमाळ येथे काटा कुस्त्यांची दंगल; जवाहरलाल दर्डा स्मृती आयोजन

googlenewsNext
ठळक मुद्देराहुल व गजानन पहेलवानांना संयुक्त विजेतेपद

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी व  लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे रविवारी दहा लाख रुपयांच्या इनामी काटा कुस्त्यांच्या विराट दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. येथील ऐतिहासिक हनुमान आखाड्याच्या प्रांगणात रविवारी रात्री १ वाजेपर्यंत प्रेक्षकांच्या चिक्कार गर्दीत काटा कुस्त्या रंगल्या. देवठाणाचा (हिंगोली) गजानन भोयर पहेलवान व अकलुजचा अनुभवी मल्ल राहुल लवटे यांच्यात प्रथम क्रमांकासाठी लढत झाली. या तूल्यबळ मल्लांची ‘नुराकुश्ती’ तब्बल ३५ मिनिटानंतरही डाव-प्रतिडाव न टाकताच बरोबरीत सुटल्याने या मल्लांना संयुक्त विजयी घोषित करण्यात आले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे रविवारी दहा लाख रुपयांच्या इनामी काटा कुस्त्यांच्या विराट दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. यात दिल्ली, भिलाई, खंडवा, हरियाणा, परभणी, हिंगोली, सोलापूर, नांदेड, कोल्हापूर, पुणे, सातारा, अमरावती आदी ठिकाणच्या ४०० हून अधिक पहेलवानांनी हजेरी लावली. या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार कीर्ती गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, सचिव अनिल पांडे आदी उपस्थित होते.
४१ हजार रुपयांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी अकुलजचा संतोष जगताप व पुण्याचा मेघराज शिंदे यांच्यात लढत झाली. या लढतीत अकुलजच्या संतोष पहेलवानाने आठ मिनिटे रंगलेल्या कुस्तीत मेघराज पहेलवानला झोळी डाव टाकून बाजी मारली. तिसºया क्रमांकाच्या ३१ हजार रुपयांच्या बक्षिसासाठी ज्ञानेश्वर पहेलवान (मंगरूळपीर) व योगेश जाधव (अकलुज) यांच्या २० मिनिट डाव-प्रतिडाव रंगले. मात्र कोणीही चित होऊ न शकल्याने लढत बरोबरीत सुटली.
या दंगलीत प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी व सर्वाधिक दाद मिळालेली चौथ्या क्रमांकाची कुस्ती झाली. दिल्लीच्या आखाड्यात सराव करणारा निर्मल पहेलवान (जलालाबाद) व मिथून चव्हाण (अकलुज) यांच्यात चित्तथरारक कुस्ती झाली. सामन्याच्या तिसºया मिनिटात मिथून पहेलवानने निर्मल पहेलवानला मातीत लोळवून त्याच्यावर सवारी केली. सवारी डावाने विजय मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या मिथून पहेलवानाचे सर्व डाव, युक्त्या निर्मल पहेलवानाने हाणून पाडल्या. तब्बल २७ मिनिटानंतर निर्मल पहेलवानाने सवारी तोडून विजेच्या चपळाईने मिथून पहेलवानला अस्मान दाखवून या कुस्तीत विजय मिळविला.
प्रेक्षकांनीही स्वयंस्फूर्ततेने विजयी पहेलवानावर बक्षिसांचा वर्षाव केला. पाचव्या क्रमांकाच्या २१ हजार रुपयांच्या लढतीत अकलुजच्या तात्या जुमळेने पुण्याच्या धर्मा शिंदे पहेलवानाचा केवळ चार मिनिटात पट काढून विजय मिळविला. सचिन वाघ (अकलुज) विरूद्ध अरुण गांगुर्डे (पुणे) यांच्यातील १५ हजार रुपये बक्षीस असलेली सहाव्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सुटली. दहा हजार रुपयांच्या सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत गेंडा पाटील (जालना) याने बाजी मारली. त्याने पुसदच्या उमेश पहेलवानला चितपट करून कुस्ती जिंकली. सात हजार रुपयांच्या कुस्तीत हनुमान पहेलवान (हिंगोली) याने अतुल भोसले (अकलुज) या पहेलवानाला केवळ एका मिनिटात अस्मान दाखवून विजय मिळविला.
महेबूब पहेलवान (वाशिम) याने पाच हजार रुपयांच्या नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत भिलाईच्या शिवशंकर पहेलवानला खडी बांगडी डावाने मात करीत दिमाखदार विजय मिळविला. तीन हजार रुपये बक्षीस असलेल्या कुस्तीसाठी राजू पहेलवान (वाºहा) विरूद्ध विनोद पहेलवान (वाशिम) यांच्यात लढत झाली. या लढतीत विनोद पहेलवानने राजू पहेलवानला धोबी पछाड करून कुस्ती जिंकली. दोन हजार रुपये बक्षीस असलेली कुस्ती रसिक पहेलवान (माळकिन्ही) याने जिंकली. या स्पर्धेत एक हजार रुपयांच्या पाच कुस्त्या व १००, २००, ३००, ४०० व ५०० रुपये रोख असलेल्या अनेक कुस्त्यांचे जोड लावण्यात आले. कुस्तीचे धावते समालोचन अरुण जाधव यांनी केले. पंच म्हणून अनिल पांडे, उद्धव बाकडे, मोहम्मद शकील, राजू किनाके, धनंजय लोखंडे यांनी काम पाहिले.

विजय दर्डा यांनी वाढविला उत्साह
लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी कुस्ती स्पर्धेला भेट देऊन मल्लांचा उत्साह वाढविला. यावेळी त्यांनी कुस्तीचा जोडही लावला. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, हनुमान आखाड्याचे संचालक तथा लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा आदी मान्यवर उपस्थित होते.

कुस्तीगीर परिषदेच्या नियमानुसार बक्षीस
अंतिम सामन्यात संयुक्तपणे विजयी झालेल्या गजानन पहेलवान व अ‍ॅड. राहुल लवटे यांना ५१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, प्रशांत बाजोरिया, प्रताप पारसकर, अनिल पांडे, सुरेश जयसिंगपुरे, मनिष पाटील, डॉ. टी.सी. राठोड, बबलू देशमुख, दीपक ठाकूर, कादिर मिर्झा, रवी ढोक, रामेश्वर यादव, हिरा मिश्रा, नितीन जाधव, रावसाहेब पालकर, प्रभाकर गटलेवार, डॉ. विजय अग्रवाल, डॉ. सी.बी. अग्रवाल, प्रकाश मिसाळ, डॉ. अजय केशवानी, अब्दुल जाकीर, विक्की राऊत, कैलास वानखडे, अभय राऊत यांच्या उपस्थितीत बक्षीस देण्यात आले. राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमाप्रमाणे बक्षिसाची रक्कम दोनही विजयी मल्लांना देण्यात आली.

Web Title: Yatmala's wrestling competitions; Organizing Jawaharlal Darda Memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.