खेड्यातील निराधार वृद्धांसाठी तरुणांचे वात्सल्य भोजनालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:59 PM2018-11-17T23:59:25+5:302018-11-18T00:00:00+5:30

मुलं सोडून गेली, कुणाला मुलंच नाहीत, कुणाला आहे पण पोसायला तयार नाहीत... मुंबई-पुण्यासारख्या शहरातच नव्हे, अशी एकाकी म्हातारी मंडळी खेड्यापाड्यातही आहे. अगदी आपल्या जिल्ह्यातल्या पार्डीनस्करी नावाच्या पाच पन्नास घरांच्या गावातही ही स्थिती आहे.

Yatus' Vatsalya Restaurant for the Old Age of the Village | खेड्यातील निराधार वृद्धांसाठी तरुणांचे वात्सल्य भोजनालय

खेड्यातील निराधार वृद्धांसाठी तरुणांचे वात्सल्य भोजनालय

Next
ठळक मुद्देघाटंजी तालुका : १९ आजी-आजोबांच्या आसऱ्याची सोमवारी वर्षपूर्ती

अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मुलं सोडून गेली, कुणाला मुलंच नाहीत, कुणाला आहे पण पोसायला तयार नाहीत... मुंबई-पुण्यासारख्या शहरातच नव्हे, अशी एकाकी म्हातारी मंडळी खेड्यापाड्यातही आहे. अगदी आपल्या जिल्ह्यातल्या पार्डीनस्करी नावाच्या पाच पन्नास घरांच्या गावातही ही स्थिती आहे. पण जसे एकाकी वृद्ध आहेत, तसे संवेदनशील तरुणही आहेत. म्हणूनच तरुणांनी एकत्र येऊन निराधार आजी-आजोबांसाठी मेस सुरू केली. म्हाताºयांना ‘वात्सल्य’ देणाऱ्या या मेसची उद्या वर्षपूर्ती होत आहे.
घाटंजी तालुक्यातील पार्डी नस्करी नावाच्या गावात ही मेस ‘वात्सल्य भोजनालय’ म्हणून गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरला सुरू झाली. या गावात असे काही वृद्ध आहेत, ज्यांना कोणाचाच आधार नाही. स्वत: कमावण्यासाठी अंगात त्राण नाही. शासनाने कधीतरी वेळेवर दिलेल्या निराधार मानधनाच्या पैशातून बेसन-भाकर शिजवायची. चूल पेटवताना फुंकणीत अक्षरश: प्राण फुंकायचा. थरथरत्या हातांना तव्याचे चटके लावून घ्यायचे. दोन घास पोटात लोटायचे अन् पुन्हा एकटेच आढ्याकडे बघत बसून राहायचे... ही सरत्या जिंदगीची अवस्था घाटंजीतील विकासगंगा सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पाहिली. आणि या खेड्यातल्या वृद्धांचा स्वयंपाकाचा त्रास संपला.
गावातीलच एका घरात वृद्धांसाठी वात्सल्य भोजनालय सुरू झाले. १९ वृद्धांना येथे रोज सकाळी १० ते १२ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत गरमागरम जेवण दिले जाते. सर्व वृद्ध वेळेवर भोजनालयात येऊन एकत्र बसून जेवतात. जेवताना आयुष्यातले सुख-दु:खही एकमेकांशी वाटून घेतात. थोडा हास्यविनोदही होतो. सुखाचे दोन घास घेऊन पुन्हा आपापल्या घरी आरामाला जातात. भोजनालयाचे तीन सदस्य मात्र तब्येतीच्या कारणामुळे भोजनालयापर्यंत येऊ शकत नाही. त्यांचा डबा घरपोच दिला जातो.
विकासगंगा संस्थेचे प्रमुख रणजित बोबडे यांच्या उपक्रमाची माहिती मिळताच मुंबईच्या केअरिंग फ्रेण्ड्स ग्रुपनेही आर्थिक भार उचलला.
वृद्धांचा स्वाभिमान मात्र शाबूत
६ पुरुष आणि १३ महिला असे १९ वृद्ध सध्या वात्सल्य भोजनालयाचे लाभार्थी आहेत. विकासगंगा आणि केअरिंग ग्रुप या मेसचा भार वाहत असले, तरी हे वृद्ध फुकट जेवत नाहीत. निराधार मानधन म्हणून ज्यांना ६०० रुपये मिळतात, त्यातले २०० रुपये ते मेसच्या कामासाठी देतात. ज्यांना असे निराधारचे मानधनही मिळत नाही, ते रेशनदुकानातील किलो-दोन किलो धान्य देतात.
नातेवाईकांनी नेले, तरी मेसमध्ये परतले
वृद्धांची नेमकी व्यथा घाटंजीतील तरुणांनी ओळखली आणि रचला महाराष्ट्रातील वृद्धांच्या पहिल्या आणि एकमेव मेसचा पाया! मेसचा आसरा मिळालेल्या १९ वृद्धांपैकी दोन वृद्धांचे नातेवाईक जरा नाराज झाले होते. ते बाहेरगावी राहायचे आणि आपल्या कुटुंबातील म्हातारी व्यक्ती मेसमध्ये जेवते, हे त्यांना खटकले. ते त्या दोन वृद्धांना आपल्या सोबत बाहेरगावी घेऊनही गेले. पण त्यातील एक वृद्ध स्वत:च्याच घरात एकाकी झाला. नातेवाईकांच्या वाईट वर्तनाला कंटाळून तो परत पार्डी नस्करीत येऊन पुन्हा वात्सल्य भोजनालयाचा सदस्य झाला आहे. हाच या मेसच्या ‘घरगुती’पणाचा पुरावा.

Web Title: Yatus' Vatsalya Restaurant for the Old Age of the Village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.