यवतमाळात व्यावसायिकाकडे पुन्हा आयकर विभागाचा सर्च
By admin | Published: November 2, 2014 10:40 PM2014-11-02T22:40:17+5:302014-11-02T22:40:17+5:30
फर्निचर आणि इमारतीला लागणारे स्टील साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडे पुन्हा आयकर विभागाने सर्च केला. यवतमाळात गेल्या महिनाभरात ही पाचवी कारवाई आहे.
यवतमाळ : फर्निचर आणि इमारतीला लागणारे स्टील साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडे पुन्हा आयकर विभागाने सर्च केला. यवतमाळात गेल्या महिनाभरात ही पाचवी कारवाई आहे. राजेश लोढा रा. नेर ह.मु. यवतमाळ असे आयकरचा सर्च झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
शहरातील दत्त चौक आणि येथील शिवाजी शाळा परिसरात अरिहंत प्लाय नावाची दोन दुकाने आहे. या दोनही दुकानांमध्ये आणि राहत्या निवासस्थानी एकाच वेळी नागपूर व यवतमाळच्या आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने शनिवारी दुपारी अचानक भेट दिली. त्यानंतर दुकान आणि घराची झडती घेण्यात आली. त्यामध्ये बिल बुक, रोजनिशी, बँक खाती, संगणकातील नोंदी, रोखेचे विवरण आदींची बारकाईने तपासणी करण्यात आली. काही महत्वाचे दस्ताऐवज आणि नोंदी ताब्यातही घेण्यात आल्या.
दोन दिवसांपूर्वी भरत दत्ताणी आणि विपूल पटेल यांच्याही घर व प्रतिष्ठानांमध्ये आयकर विभागाने सर्च राबविला. त्यापूर्वी धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी येथील सराफा बाजारातील शाह आभूषण आणि शाह ज्वेलर्समध्येही आयकर विभागाने सर्च राबविला. ही यवतमाळातील पाचवी कारवाई आहे. (स्थानिक प्रतिनिधी)