यवतमाळ : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकासह तिघांवर एसीबी ‘ट्रॅप’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 05:21 PM2019-01-05T17:21:56+5:302019-01-05T17:22:04+5:30
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक व पोलीस शिपायावर शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागितल्याचा गुन्हा नोंदविला.
यवतमाळ : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक व पोलीस शिपायावर शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागितल्याचा गुन्हा नोंदविला. या कारवाईने जिल्हा पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. या डिलिंगबाबत ‘लोकमत’ने २५ डिसेंबरच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतरही हे पोलीस अधिकारी सावध झाले नाही. अखेर २५ लाखांची भुरळ पडलेल्या या अधिका-यांना एसीबीच्या जाळ्यात अडकावे लागले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद काशीनाथ कुलकर्णी (४८), सहायक पोलीस निरीक्षक संदीप प्रभाकर चव्हाण (३६) व पोलीस नायक सुनील विठ्ठल बोटरे (३८) या तिघांविरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात लाचप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शनिवारी दारव्हा रोडवरील चिंतामणी पेट्रोल पंपासमोर सुनील बोटरे या पोलीस कर्मचा-याला पाच लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही लाच आपण पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्याकरिता मागणी केल्याचे त्याने एसीबीला सांगितले.
कळंब येथील एका जिनिंगमध्ये काही महिन्यांपूर्वी पोलीस व कृषी विभागाने संयुक्त धाड घातली होती. तेथून संशयास्पद खते, बियाणे व कीटकनाशके असा ६१ लाखांचा साठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात कळंब पोलीस ठाण्यात थोटे बंधूविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. त्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला गेला.
२५ लाखांची डिमांड, २० लाखांत डील
कळंबमधील या गुन्ह्यात सदोष दोषारोपपत्र पाठविणे, गुन्ह्याची तीव्रता कमी करणे, जप्तीतील माल सोडणे, अधिक माल जप्त न करणे, कलमे कमी करणे व भावाकडून घेतलेली शेतीची मूळ खरेदी, इसार पावती, धनादेश परत करणे याकरिता स्थानिक गुन्हे शाखेकडून २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती २० लाखात ‘डिलिंग’ पक्की झाली. त्यातील पाच लाख रुपये शनिवारी देण्याचे ठरले. मात्र ही रक्कम द्यायची नसल्याने कळंबच्या त्या कारखाना मालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अमरावती येथील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात एसीबीचे अमरावती येथील पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या नेतृत्वात सापळा रचण्यात आला व पाच लाखांची लाच स्वीकारताना पोलीस शिपायाला यवतमाळात रंगेहात पकडण्यात आले. कुळकर्णी व बोटरे यांना एसीबी पथकाने लगेच ताब्यात घेतले. मात्र एपीआय चव्हाण सुटीवर असल्याचे सांगितले जाते. या कारवाईत एसीबीचे श्रीकृष्ण तालन, सुनील व-हाडे, अभय वाघ, महेंद्र साखरे, शैलेष कडू, चंद्रकांत जनबंधू या पोलीस कर्मचा-यांनी सहभाग घेतला.
कृषी अधिका-यांचीही नावे
तक्रारकर्त्याच्या कुटुंबीयांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत जिल्हा परिषद व शासनाच्या येथील कृषी अधिकाºयांनी प्रचंड त्रास दिल्याचे, पोलिसातून पैशासाठी सर्वाधिक त्रास सहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी दिल्याचे सांगितले.