यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती - व्यापाऱ्यांच्या दावणीला
By admin | Published: February 26, 2015 02:02 AM2015-02-26T02:02:40+5:302015-02-26T02:05:45+5:30
शासनाने शेतकऱ्यांच्या सोईसाठी सुरू केलेली यवतमाळची कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधली आहे.
राजेश निस्ताने यवतमाळ
शासनाने शेतकऱ्यांच्या सोईसाठी सुरू केलेली यवतमाळची कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधली आहे. बाजार समितीवर संचालक मंडळ असताना जी स्थिती होती, त्यापेक्षाही वाईट अवस्था आता प्रशासक असताना निर्माण झाली आहे.
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू आहे. सहकार विभागाचे अधिकारी या लुटीचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. या लुटीतील ‘वाटा’ त्यांना नक्कीच मिळत असावा, अशी खात्री त्यांची ‘धृतराष्ट्राची’ भूमिका पाहून कुणालाही होऊ शकते. या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा कुणीच वाली नाही. तेथे एन्ट्री केल्यापासून तर बाहेर निघेपर्यंत ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा मानसिक छळ, आर्थिक लूट होताना दिसते. ‘व्यापारी म्हणतील ती पूर्व दिशा’ असा कारभार सध्या तेथे सुरू आहे. व्यापारी, अडते आणि सहकार प्रशासनाच्या संगनमताने शेतकरी गंडविला जात आहे. घाम गाळून शेतकरी आपला माल विक्रीसाठी बाजार समितीत आणतो. मात्र हमी भावाच्या दीड ते दोन हजार रुपये कमी दरापासून मालाची बोली लावली जाते. नियमानुसार हमी भावाच्या पुढे बोली लागणे अपेक्षित आहे. मात्र व्यापारी सर्रास शेतकऱ्यांची लूटमार करीत असल्याचे चित्र मंगळवारी व बुधवारी अनुभवायला मिळाले. शेतकऱ्यांना तेथे बोलण्याची सोय नाही, त्याने नियमावर बोट ठेवल्यास थेट खरेदी बंद करू अशी धमकी व्यापारी देतात. फेरफटका मारला असता ही बाजार समितीत शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची असा प्रश्न पडता. शेतकऱ्यांच्या मालाचा लिलाव चक्क बाजार समितीच्या कार्यालयासमोरच उघड्यावर होताना दिसून आला. वास्तविक हा लिलाव बाजार समितीच्या यार्डात होणे अपेक्षित आहे. परंतु यार्डात संपूर्ण व्यापाऱ्यांचा माल भरुन आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून हा माल सहकार प्रशासनाच्या मेहेरबानीमुळे तेथेच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल ठेवण्यास जागाच नाही. शेतकरी मालासाठी यार्ड शोधताना दिसतात तर दुसरीकडे हे यार्ड खासगी कार्यक्रमासाठी दिले जात असल्याचा प्रकारही निदर्शनास आला.