यवतमाळ : झरी तालुक्यात आढळले प्राचीन दगडी खांब
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 11:04 PM2021-06-29T23:04:26+5:302021-06-29T23:04:59+5:30
पांढरकवडा-शिबला रस्ता रूंदीकरण करताना सापडला खजिना
झरी (यवतमाळ) : तालुक्यातील शिबला ते पांढरकवडा या मुख्य रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. तालुक्यातील पार्डी गावाजवळील वळण रस्त्यावर खोदकाम करीत असताना प्राचीन काळातील दगडी खांब आढळून आले. यावरून याठिकाणी पुरातन काळात एखादे साम्राज्य असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
झरी तालुक्यात अनेक रहस्यमय बाबी आहेत. हा भाग मागासलेला असला तरी तालुक्यात आजही अनेक रहस्यमय बाबी आहेत. तालुक्यातील खापरी शेखापूर जंगलातही वेगवेगळ्या आकाराचे दगड आढळून आले आहेत. पूर्वी तेथे गाव असल्याच्या खुणा आढळतात. या दगडी खांबामुळे पुरातत्व विभागाला संशोधनाची संधी प्राप्त झाली आहे. कायर भागातही खोदकामात अनेक प्राचीन अवशेष सापडले असून कायर, जुनी मांगली, भुडकेशवर येथे प्राचीन मंदिरे आहेत. ही मंदिरे त्या काळच्या राजाने निर्माण केलेली आहेत. काळाच्या ओघात अनेक उलथापालथी होऊन वास्तू दडल्या जाते.
मात्र काही पुरावे सोडून जातात. माथार्जुन येथेही फार पूर्वी सतीप्रथा होती, असे काही बुजुर्ग सांगतात. सतीच्या समाधीचे काही दगड याठिकाणी आहेत. या भागाकडे दुर्लक्ष झाले असले तरी मानवी इतिहास हा फार जुना आहे. भूकंप, नैसर्गिक संकटे यात अनेक प्राचीन वैभव नाहीसे झालेले आहे. या दगडामुळे इतिहासकारांना संशोधनासाठी एक नवा विषय मिळाला आहे. दरम्यान, रस्त्यावर पुरातन काळातील अशी दगडी खांब आढळून आल्याने परिसरात मात्र हा कुतूहलाचा विषय बनला आहे.