यवतमाळात संतप्त शेतकऱ्यांनी बँकेत काचा फोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 12:53 PM2020-10-30T12:53:12+5:302020-10-30T13:43:39+5:30
Yawatmal News रबी हंगामासाठी पीक कर्ज आणि नवीन खाते उघडण्यासाठी बँकेत गेलेल्या शेतकऱ्यांना सुरक्षा रक्षकाच्या अभद्र वागणूक व मुजोरीचा सामना करावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रबी हंगामासाठी पीक कर्ज आणि नवीन खाते उघडण्यासाठी बँकेत गेलेल्या शेतकऱ्यांना सुरक्षा रक्षकाच्या अभद्र वागणूक व मुजोरीचा सामना करावा लागला. अखेर संतप्त शेतकऱ्यांनी बँकेच्या काचा फोडून या मुजोरीला चोख उत्तर दिले. जिल्ह्याच्या महागाव येथे युनियन बँक शाखेत गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
युनियन बँकेपुढे तालुक्यातील शेतकऱ्यांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. मात्र सुरक्षा रक्षकाने चॅनल गेट उघडलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तासन्तास ताटकळत रहावे लागले. गेट उघडत नसल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी सुरक्षा रक्षकाला बाजूला करीत स्वत:च चॅनल गेट उघडले. यावेळी शेतकऱ्यांना धक्काबुक्की केली गेल्याने शेतकऱ्यांनी संतप्त होऊन बँकेच्या काचा फोडत आपला रोष व्यक्त केला.
यवतमाळ येथे बँकेच्या कारभारावर संतप्त शेतकऱ्यांनी केली तोडफोड #farmerpic.twitter.com/N7g7kSLQdZ
— Lokmat (@MiLOKMAT) October 30, 2020
दोनच दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पीक कर्ज वाटपात सुसूत्रता आणण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतरही बँकांची मुजोरी कायम असल्याचे स्पष्ट होते. विशेष असे राष्ट्रीयकृत बँकांचे खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप कमी आहे. त्यावरही प्रशासनाने नाराजी व्यक्त केली. खरिपातील वंचित शेतकऱ्यांना आता रबी हंगामात पीक कर्ज देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.