यवतमाळ: पारधी जमातीतील अंजुता झाली एसटी चालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:38 PM2018-04-25T12:38:14+5:302018-04-25T12:38:21+5:30
नेर तालुक्यातील मुकींदपूर पारधी बेड्यावर अंजुता इलाहाबाद भोसले ही तरुणी एसटी महामंडळात चालक पदावर नियुक्त झाली.
किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रानोमाळ भटकंती, शिकारीवर चरितार्थ यामुळे शिक्षणपासून दूर असलेल्या पारधी समाजातील एका तरुणीने इतिहास घडविला. नेर तालुक्यातील मुकींदपूर पारधी बेड्यावर अंजुता इलाहाबाद भोसले ही तरुणी एसटी महामंडळात चालक पदावर नियुक्त झाली. पारध जमातीतील ती पहिलीच एसटी चालक तरुणी ठरली आहे.
पारधी जमातीमध्ये शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण आहे. शिक्षणापासून कोसोदूर असल्याने या समाजात बोटावर मोजण्याइतकेच मुले नोकरीवर आहेत. त्यातही मुलींची संख्या तर नगण्यच. मात्र अंजुता त्याला अपवाद ठरली. शिक्षणाची आवड असलेल्या अंजुताने नेर येथील जिजामाता शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर तिने रमाई आदिवासी आश्रमशाळेतून १२ वी उत्तीर्ण केले. यानंतर जमातीच्या रुढीपरंपरेप्रमाणे तिच्यावर घरुन लग्नासाठी दबाव आला. मात्र स्पष्ट शब्दात नकार देत आपण नोकरी करणार असल्याचे तिने सांगितले. यासाठी तिने नेर येथील ओम ड्रायव्हींग स्कूलमधून चालकाचे प्रशिक्षण घेतले. त्यासाठी तिला मुख्यमंत्री दूत राजू केंद्रे यांनी सहकार्य केले. अशातच एसटी महामंडळाची चालक पदाची भरती निघाली. त्यात तिने अर्ज केला. सर्व फेऱ्या पार करीत तिची प्रशिक्षणासाठी पांढरकवडा येथे निवड झाली. तीन महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ती एसटीचे स्टेअरिंग हाती घेणार आहे. एसटी बस चालविणारी पारधी समाजातील ही पहिली तरुणी असावी. एसटी चालक म्हणून तिची निवड झाल्याने नारीशक्ती संघटनेच्यावतीने अंजुताचा नेर नगरपरिषद उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.