यवतमाळ ते आर्णी मार्गाची झाली चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:38 PM2018-10-12T23:38:42+5:302018-10-12T23:39:22+5:30
नागपूर राज्य मार्गाच्या चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या मुरुम, गिट्टीची ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्याने यवतमाळ ते आर्णी मार्गाची चाळणी झाली आहे. या वाहतुकीने रस्त्याची ऐसीतैसी झाल्याने वाहनधारक संतापले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नागपूर राज्य मार्गाच्या चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या मुरुम, गिट्टीची ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्याने यवतमाळ ते आर्णी मार्गाची चाळणी झाली आहे. या वाहतुकीने रस्त्याची ऐसीतैसी झाल्याने वाहनधारक संतापले आहे.
नागपूर ते तुळजापूर या महामार्गाच्या चौपदरीकरण आणि सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी अर्जुना येथे रस्ता बंधकाम कंपनीतर्फे प्लँट थाटला आहे. तेथून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने यवतमाळ ते आर्णी मार्गाची चाळणी झाली. या वाहतुकीने या मार्गाची ऐसीतैसी झाली. परिणामी रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता हे शोधणे कठीण झाले आहे. त्यामुळे मार्गावरील वाहनधारकांना आपला जीव मुठेत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या खड्यांमुळे आत्तापर्यंत अनेकदा अपघात झाले. त्यात वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अर्जुना घाटात घाट सरळ करण्याचे काम सुरू आहे. तेथील मुरुम दुसरीकडे स्थानांतरीत केला जात आहे. जवळपास दोन ते तीन किलोमीटरचा घाट सरळ करण्याचा व त्या मुरुमाची विल्हेवाट लावण्याचा सपाटा सुरू आहे.
या अवजड वाहतुकीने रस्त्याची पूर्णत: वाट लागली आहे. रस्ता डीव्हायडरध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंटची भुकटी टाकल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. सिमेंटची धूळ उडून ते वाहनधारकांच्या डोळ्यात जात आहे. परिणामी समोरून येणारे वाहन त्यांना दिसत नाही. त्यातूनच सातत्याने अपघात घडत आहे. यामुळे प्रवाशांचे आरोग्य तर सोडाच त्यांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. एकीकडे राज्य मार्गाचे चौपदीकरण होत असताना दुसरीकडे वाहतुकीने मार्गाची ऐसीतैसी होत आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
फलक नसल्याने वाहनधारक गोंधळात
यवतमाळ-आर्णी मार्गाच्या काही भागात वाहतुकीने रस्ता पूर्णत: उखडला आहे. अवजड वाहतुकीने या मार्गाची वाताहत होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. जुना रस्ता खोदणे किंवा उखडण्याचे काम सुरू करण्याच्या आधी प्रवाशांना नवीन रस्ता करून देणे व नंतर नवीन खोदकाम करून रस्ता बनविणे, असे स्पष्ट आदेश आहे. त्याची कुठेही दखल घेतली जात नाही. पर्यायी रस्ता बनविण्यापूर्वीच जुना रस्ता फोडफाड केला जात आहे. शिवाय अनेक ठिकाणी सूचना फलकही नाही. त्यामुळे वाहनधारक गोंधळात पडत आहे.