यवतमाळ शहरात रविवारी वाहनांना प्रवेश बंदी
By admin | Published: September 24, 2016 02:32 AM2016-09-24T02:32:46+5:302016-09-24T02:32:46+5:30
मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चा निमित्त यवतमाळ शहरात रविवारी सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली
मराठा-कुणबी मोर्चा : सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत बायपासने वाहतूक
यवतमाळ : मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चा निमित्त यवतमाळ शहरात रविवारी सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण वाहतूक बायपासने वळविण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यवतमाळ शहरात निघणाऱ्या या मोर्चात तीन लाख नागरिक सहभागी होतील, असा अंदाज घेऊन संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. यवतमाळच्या पोस्टल ग्राऊंड (समता मैदान) येथे मराठा-कुणबी समाज बांधव एकत्र येणार आहे. तेथून हा मोर्चा पुनम चौक, हनुमान आखाडा चौक, इंदिरा गांधी मार्केट, पाचकंदील चौक, तहसील चौक, जाजू चौक, दत्त चौक, नेताजी चौक, बसस्थानक आणि एलआयसी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे. या मोर्चामुळे शहरात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता शहरात येणारी सर्व वाहतूक बायपासने वळविण्यात आली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही बंदी राहणार आहे. एसटी बसने येणाऱ्या प्रवाशांनाही बायपासवरच सोडून देण्यात येणार आहे. केवळ रुग्णवाहिका अग्नीशमन बंब आणि पोलिसांच्याच वाहनाना शहरात प्रवेश देण्यात येईल. मूक मोर्चात सहभागी होणारे वाहने तालुकानिहाय केलेल्या पार्किंगच्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे.
अपर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांच्या नेतृत्वात बंदोबस्त ठेवला जाणार आहे. चार डीवायएसपी, १६ पोलीस निरीक्षक, ८६ सहायक निरीक्षक, ६२५ पोलीस, १०५ महिला पोलीस, ७३ वाहतूक पोलीस आणि एक एसआरपीएफची कंपनी, आरसीपीचे तीन प्लाटून, क्युआरटीचे एक प्लाटून तैनात राहतील. (कार्यालय प्रतिनिधी)
येथे वाहनांना प्रतिबंध
मूक मोर्चा शहरातून मार्गक्रमण करणार असल्याने शहरात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांना पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात आला आहे. शारदा चौक, शनिमंदिर चौक, अॅग्लो हिंदी हायस्कूल, वडगाव रोड पोलीस ठाणे, गोदनी रोड, तिवारी चौक, वीर वामनराव चौक, आयुर्वेदिक कॉलेज, आर्णी नाका चौक, लाठीवाला पेट्रोल पंप चौक, शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकाऱ्यांचे शासकीय निवासस्थान परिसर, स्टेट बँक चौक, सिव्हील लाईन, पूनम चौक, हनुमान आखाडा चौक या ठिकाणी बॅरिकेटस् लावून वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येणार आहे. या मार्गाने येणारी वाहतूक लगतच्या छोट्या रस्त्याने वळविण्यात येईल.