यवतमाळ शहरात पुन्हा कोरोनाची एन्ट्री, 1 पॉझिटीव्ह 9 क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 01:49 PM2020-06-17T13:49:46+5:302020-06-17T13:51:04+5:30
कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या या व्यक्तिच्या कुटुंबातील 9 सदस्यांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे
यवतमाळ - गत तीन महिन्यांपासून यवतमाळ शहरात असलेला कोरोनाचा उद्रेक पूर्णपणे शांत झाला होता. शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत असतांनाच आता पुन्हा शहरात कोरोनाची एन्ट्री झाली आहे. नेताजी चौक येथील 45 वर्षीय व्यक्ती औरंगाबाद येथून आला असता त्याचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला आहे. सदर व्यक्तिला दोन – तीन दिवसांपासून ताप आणि खोकला आहे. तसेच त्याने सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्या रुग्णालयाने त्याला वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले.
कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या या व्यक्तिच्या कुटुंबातील 9 सदस्यांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. कोरोनामुक्त झालेले यवतमाळ शहर पुन्हा एकदा कोरोनाच्या रडारवर आले असून हा व्यक्ती राहत असलेला शहरातील भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व नागरिकांनी या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इतरांच्या सपंर्कात येऊ नये. अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीकरीता बाजारात गेल्यास सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे. तसेच मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. अनावश्यकपणे नागरिकांनी बाहेर फिरू नये. साबणाने वारंवार स्वच्छ हात धुवावे व नियमित सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.