यवतमाळ बसस्थानकात प्लॅटफार्म रिकामे, आगार खचाखच भरलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 09:30 PM2019-03-25T21:30:37+5:302019-03-25T21:30:51+5:30
बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनी बसस्थानक खचाखच भरलेले, तर प्लॅटफार्म रिकामे. दुसरीकडे आगारात बसेस एका रांगेत लावून. यवतमाळ बसस्थानक व आगारातील सोमवारचे हे चित्र प्रवाशांना वेठीस धरणारे तर, एसटीसाठी आर्थिक नुकसानीचे ठरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनी बसस्थानक खचाखच भरलेले, तर प्लॅटफार्म रिकामे. दुसरीकडे आगारात बसेस एका रांगेत लावून. यवतमाळ बसस्थानक व आगारातील सोमवारचे हे चित्र प्रवाशांना वेठीस धरणारे तर, एसटीसाठी आर्थिक नुकसानीचे ठरले.
नागपूर, अमरावती व इतर काही मार्गावर दर अर्ध्या तासाने बस सोडली जाईल, ही यवतमाळ आगाराची घोषणा फुसका बार ठरली. वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक फेऱ्या रद्द केल्या जात आहे. अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने हा प्रकार सुरू आहे. जिल्हा मुख्यालयाच्या बसस्थानकाची ही परिस्थिती आहे, तर इतर ठिकाणच्या आगाराचे चित्र कसे असेल, याचा विचारच न केलेला बरा.
बसस्थानकात कार्यरत अधिकारी, पर्यवेक्षकीय कर्मचारी, कामगारांवर कुणाचाही वचक राहिलेला नाही. मनमर्जी काम सुरू आहे. परिणामी बसफेºया रद्द होणे, उशिराने सुटणे या बाबी नित्याच्या झाल्या आहेत. चालक, वाहक बस सोडण्याच्या वेळेवर पोहोचले नाही, आगारातून बस मिळाली नाही यासह इतर कारणे यासाठी सांगितली जातात. सोमवारी तब्बल दहा ते १५ बसफेºयांचे वेळापत्रक कोलमडले होते. काही फेºया रद्द झाल्या. बसअभावी अनेक प्रवाशांनी खासगीकडे धाव घेतली. मोठी गर्दी असतानाही याचा फायदा एसटीला घेता आला नाही. दुपारी १ वाजताच्या सुमारास तर नागपूर-अमरावती प्लॅटफार्मवर एकही बस नव्हती. बाहेरून आलेल्या बसमधून नागरिकांना कोंबून प्रवास करावा लागला. विभाग नियंत्रकांनी मनावर घेतल्यास सर्व सुरळीत होऊ शकते, असे कामगारांमधून बोलले जात आहे.