केंद्रीय सर्वेक्षणाने यवतमाळ शहर स्वच्छतेचा पर्दाफाश
By admin | Published: May 6, 2017 12:11 AM2017-05-06T00:11:44+5:302017-05-06T00:11:44+5:30
शहरातील घाणीचे साम्राज्य व नियमित न होणाऱ्या साफसफाईबाबत नगरसेवक व नागरिक नियमितच तक्रारी करतात.
देशात २३० वा क्रमांक : घाणीचे साम्राज्य, शहर झाले बकाल
जिल्हा प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील घाणीचे साम्राज्य व नियमित न होणाऱ्या साफसफाईबाबत नगरसेवक व नागरिक नियमितच तक्रारी करतात. परंतु आता शहरातील या साफसफाईचा खुद्द केंद्र शासनाच्या सर्वेक्षण अहवालानेच पर्दाफाश केला आहे. यवतमाळ नगरपरिषद स्वच्छतेमध्ये देशात तब्बल २३० व्या क्रमांकावर आहे. त्यावरून शहरातील साफसफाईचे कसे तीनतेरा वाजले असेल, याची कल्पना येते.
कधीकाळी यवतमाळ नगरपरिषदेचे स्वच्छता अभियानामध्ये राज्यात नाव होते. या नगरपरिषदेने राज्यस्तरीय पुरस्कार मिळविले आहे. त्या काळात प्रत्यक्षात शहरातील अंतर्गत रस्ते, नाल्यांची सफाई, पथदिवे, खड्डेमुक्त रस्ते होते. परंतु त्यानंतर नगरपरिषदेमध्ये चाललेल्या ‘राजकारणाने’ संपूर्ण शहराचीच वाट लावली. आजही नगरपरिषद क्षेत्रातील साफसफाईची समस्या कायम आहे. गेल्या तीन वर्षांपासून शहराचा साफसफाईचा कंत्राट मुदतवाढीवर सुरू आहे. त्याचा वाद निकाली काढण्यात नगरपरिषदेचे पदाधिकारी व प्रशासनाला अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळेच शहराची ही अवस्था झाली आहे. या सफाई कंत्राटात अर्थकारण दडलेले आहे. नगरपरिषदेमध्ये समाविष्ट झालेल्या आठ ग्रामपंचायत क्षेत्रांची अवस्था तर आणखीनच बिकट आहे. शहरात कचरा नेणारी घंटागाडी क्वचितच दिसते. जिल्ह्यातील उमरखेड, पांढरकवडा या नगरपरिषदा कोटी-कोटी रुपयांचे विभागीय पुरस्कार पटकावत असताना जिल्हा मुख्यालयाची यवतमाळ नगरपरिषद मात्र एक-एक पाऊल मागे जाताना दिसते आहे. यातच नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक व प्रशासनाचे अपयश दडले आहे. यवतमाळ शहरातील डम्पिंग यार्डची समस्या कायम आहे. पावसाळा येऊ घातला असताना अद्यापही मान्सूनपूर्व उपाययोजना अर्थात नाले-नाल्यांची सफाई झालेली नाही. नगरपरिषदेची यंत्रणा केवळ हागणदारीवर लक्ष केंद्रित करून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. नगराध्यक्ष शिवसेनेचा व बहुमत भाजपाचे या विसंगत राजकारणामुळे यवतमाळ शहराचा विकास खुंटला आहे. नगरसेवकांची एनर्जी राजकारणातच खर्ची होत आहे. शहराची अवस्था पाहता देशात २३० वासुद्धा क्रमांक असेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
मुख्याधिकारी धुपेंचा दावा आश्चर्यकारक
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी यवतमाळ शहर स्वच्छतेमध्ये राज्यात २७ व्या, तर विदर्भात पहिल्या क्रमांकावर असल्याचा आश्चर्यकारक दावा केला आहे. शहराची प्रत्यक्ष अवस्था पाहता त्यांचा हा दावा कुणालाही हास्यास्पद वाटू शकतो.