यवतमाळ शहर देशी कट्ट्यांच्या ढिगाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 11:22 PM2018-02-18T23:22:51+5:302018-02-18T23:23:26+5:30
संघटित गुन्हेगारी, टोळीयुद्धासाठी ओळखले जाणारे यवतमाळ शहर सध्या अग्नीशस्त्रांच्या (रिव्हॉल्वर, पिस्तूल-देशी कट्टा आदी) ढिगाऱ्यावर आहे. शहरातील हजारो तरुणांच्या हातात देशी कट्टे आले असून ही अग्नीशस्त्रे जणू त्यांच्या उपजीविकेचे साधन बनले आहे.
राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संघटित गुन्हेगारी, टोळीयुद्धासाठी ओळखले जाणारे यवतमाळ शहर सध्या अग्नीशस्त्रांच्या (रिव्हॉल्वर, पिस्तूल-देशी कट्टा आदी) ढिगाऱ्यावर आहे. शहरातील हजारो तरुणांच्या हातात देशी कट्टे आले असून ही अग्नीशस्त्रे जणू त्यांच्या उपजीविकेचे साधन बनले आहे. त्यातूनच खून, प्राणघातक हल्ले, शस्त्रांची तस्करी या सारख्या गुन्हेगारी कारवाया प्रचंड वाढल्या आहे.
यवतमाळ पोलिसांनी येथील नगरसेवकासह चार जणांना शस्त्र खरेदी व्यवहारात अटक केली होती. त्यांच्याकडून सहा पिस्तूल व बारा काडतूस जप्त केले होते. यातील आरोपींना जामीन मिळण्यापूर्वीच नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी यवतमाळात धाड घालून दोन पिस्तूल व काडतूस जप्त केले. या दोनही कारवायांनी यवतमाळात अग्नीशस्त्रांचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याचे संकेत दिले आहे. यवतमाळच्या संघटित गुन्हेगारीची पुणे-मुंबईपर्यंत चर्चा राहते. अलिकडे ही गुन्हेगारी प्रचंड फोफावली असून त्याला विशिष्ट रंग चढला आहे. या गुन्हेगारांना पोलिसांकडून पाहिजे तसा कोणताच अटकाव केला जात नसल्याने त्यांचा प्रचंड धुमाकूळ शहरात सुरू आहे. शहरात विविध भागात लहान-मोठ्या टोळ्या आहेत. या टोळ्यांमधील तरुण सदस्यांच्या हाती तलवार, चॉपर, चाकू, सत्तूर, कोयता हीच नव्हे तर अग्नीशस्त्रेही आली आहेत. आजच्या घडीला यवतमाळ शहरात किमान दोन हजार अग्नीशस्त्रे असतील, असा अंदाज गुन्हेगारी जगतातील कारभाराचे साक्षीदार असलेल्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्याला पोलीस वर्तुळातूनही खासगीत दुजोरा दिला जातो आहे. शहराच्या विविध भागांमधील काही युवकांकडे अग्नीशस्त्रे असल्याची माहिती पोलीस वर्तुळातील चर्चेतूनच पुढे आली आहे. अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या या युवकांचा त्या-त्या परिसरातील सामान्य नागरिकांना प्रचंड त्रासही आहे. या शस्त्रांच्या बळावर हे युवक आपल्या रहिवासी परिसरात दादागिरी करतात. जीवाच्या भीतीने त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्याचे धाडस कुणी करीत नाहीत. त्यामुळेच या गुन्हेगारांचे फावते आहे.
अनेक सण-उत्सव व मिरवणुकांच्या काळात काही युवक जवळ शस्त्रे बाळगतात. काही जण तर पर्याय म्हणून दुसरी पिस्तूलही जवळ ठेवतात. पहिली हँग झाली तर दुसरी चालविता यावी, असा त्यांचा यामागील उद्देश असतो. घरावर छत नाही, मात्र खिशात अग्नीशस्त्र आहे, अशी स्थिती अनेक भागात पहायला मिळते.
अग्नीशस्त्रांबाबत बहुतांश माहिती पोलिसांच्या विविध शाखा, पथके, स्कॉड यांना आहे. मात्र स्थानिक संबंधामुळे राजकीय दबाव येण्याच्या भीतीने पोलीस कारवाई करणे टाळली जात असल्याचे बोलले जाते. काहींची इच्छा असलीतरी वरिष्ठांचे बॅकअप मिळत नसल्याचा त्यांचा अनुभव आहे.
व्यवहारातून फुटले देशी कट्ट्यांच्या तस्करीचे बिंग
बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर येथील अग्नीशस्त्रांचा तस्कर उमाळे हा मध्यप्रदेशातून यवतमाळपर्यंत पिस्तुलाची तस्करी करीत होता. तो स्वत: यवतमाळात अग्नीशस्त्रांची डिलीव्हरी देत होता. दिवाळीदरम्यान त्याने यवतमाळात देशी कट्ट्यांची खेप पोहोचविली. परंतु त्याचे पैसे त्याला मिळाले नाही. अखेर यातूनच त्याने पोलिसांना टीप दिल्याची चर्चा आहे. त्यामुळेच की काय पोलिसांनी शस्त्रे पुरवठा करणाºया उमाळेला पाचव्या क्रमांकावर तर शस्त्र खरेदीदारांना चक्क पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावर आरोपी बनविले आहे. उमाळेची भविष्यात न्यायालयातून सुटका व्हावी, असा छुपा अजेंडा त्यामागे असल्याचे पोलीस वर्तुळातून बोलले जाते. वास्तविक पोलीस मध्यप्रदेशपर्यंत तपास नेऊन त्यातून रिझल्टही मिळवू शकतात. परंतु अग्नीशस्त्रांची ही तस्करी अशीच चालत रहावी व त्यातून ‘लाभाचे पाट’ आपल्यापर्यंत असेच दीर्घकाळ वाहत रहावे अशी अनेक पोलिसांची मनीषा असल्याचे बोलले जाते. पोलिसांच्या विविध शाखा, पथके, स्कॉडमधील सक्रिय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मोबाईलचे ‘सीडीआर’ काढल्यास ते दिवसभरात गुन्हेगारी जगतातील किती सदस्यांच्या संपर्कात असतात हे सिद्ध होण्यास वेळ लागणार नाही. मात्र त्यासाठी सत्ताधाऱ्यांचा राजकीय दबाव झुगारुन लावण्याची तयारी पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित आहे. तरच अग्नीशस्त्राच्या ढिगाºयावरील या यवतमाळ शहराला वाचविणे शक्य होईल, असा गुन्हेगारी जगतातून बाहेर पडलेले काही सदस्य आणि समाजासाठी काही तरी करण्यासाठी धडपडणाºया पोलीस कर्मचाºयांचा सूर आहे.
मध्यप्रदेशातील कटणी, देडतलई, उत्तर प्रदेशातील बस्ती या भागातून बहुतांश या अग्नीशस्त्रांची डिलीव्हरी होते.
पूर्वी यवतमाळच्या गुन्हेगारी वर्तुळातील सदस्य संरक्षणार्थ पिस्तूल वापरत होते. परंतु आता काहींनी या रिव्हॉल्वर-पिस्तुलांच्या तस्करीचा व्यवसायच उपजीविकेचे साधन म्हणून निवडला आहे.
अनेक युवक सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन या शस्त्र तस्करीत गुंतवणूक करीत आहे.
एक लाख रुपयात दहा ते बारा पिस्तूल येतात. त्याची घरपोच डिलीव्हरी केली जाते. पैशासाठी साईडही देण्यात येते. पाच ते सात हजारात मिळणारा हा देशीकट्टा हे युवक गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांना जसा भाव येईल तसा अर्थात २० हजारांपासून ६० हजारापर्यंत विकतात.
यवतमाळात एखाद्याकडील राऊंड संपले तर तो आपला माल येईपर्यंत इतरांकडून राऊंड उधार घेतो. हे राऊंड उधारीवर उपलब्ध करून देण्याची तजवीज अग्नीशस्त्र तस्करांकडे आहे.