यवतमाळ पालिकेचा अर्थसंकल्प काल्पनिक उत्पन्नावर आधारित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 10:11 PM2018-01-31T22:11:19+5:302018-01-31T22:11:31+5:30
नगरपरिषदेत बुधवारी स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प मंजुरीसाठी ठेवण्यात आला. प्रस्तावित अर्थसंकल्प १८५ कोटींच्या शिलकीचा दर्शविण्यात आला. त्यासाठी जवळ नसलेल्या जागेतून शंभर कोटीचे उत्पन्न दाखविले गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपरिषदेत बुधवारी स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प मंजुरीसाठी ठेवण्यात आला. प्रस्तावित अर्थसंकल्प १८५ कोटींच्या शिलकीचा दर्शविण्यात आला. त्यासाठी जवळ नसलेल्या जागेतून शंभर कोटीचे उत्पन्न दाखविले गेले. यावर नगराध्यक्षांसह सभापतींनी आक्षेप नोंदविला.
नगरपरिषदेने २०१८-१९ आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित अर्थसंकल्प तयार केला. यात विविध अनुदानासह ४११ कोटी ९८ लाखांची तरतूद दाखविली. यापैकी १८५ कोटी ८६ लाख रुपये नगरपरिषदेची शिलकी दाखविली. मूळात प्रत्यक्ष उत्पन्नाबाबत ठोसपणे कुठेच उल्लेख नाही. मालमत्ता करातून २३ कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र आठ महिन्यात केवळ तीन कोटी ५९ लाख कर वसुली झाली. ७७ लाखांचा शिक्षण कर शासन जमा होणार आहे. दैनिक बाजार वसुलीतून ५५ लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. आत्तापर्यंत केवळ २४ लाख २२ हजार वसुली झाली. आठवडीबाजारातून २० लाखांचे उत्पन्न अपेक्षित असताना केवळ चार लाख ७९ हजारांची वसुली झाली. गाळे भाड्यातून दोन कोटींचे उत्पन्न प्रस्तावित होते. त्यापैकी केवळ ५३ लाख वसूल झाले.
आर्थिक स्त्रोतात मोठ्या प्रमाणात घट झाली असताना प्रशासनाने १८५ कोटींच्या शिलकी अंदाजपत्रकाचा जावईशोध लावला. यात ९० कोटींचे उत्पन्न टीबी हॉस्पिटलच्या जागेतून दाखविले. ही जागा नगरपालिकेकडे अद्याप हस्तांतरितच झाली नाही. राज्य शासनाला या जागेच्या मोबदल्यात ३६ कोटी रुपये नगरपालिकेला देणे बाकी आहे. त्यानंतरही ९० कोटींच्या उत्पन्नाचा समावेश अर्थसंकल्पात आहे. याहीपेक्षा मजेशीर बाब म्हणजे पालिका अमृत योजनेसाठी ४० कोटींचे कर्ज घेणार असून हे कर्ज मंजूर होण्याअगोदरच प्रस्तावित रक्कम शिलकीत दाखविली गेली.
याशिवाय ५५ कोटी ८६ लाखांचे विविध योजनांचे अनुदान नगरपरिषदेकडे अखर्चित आहेत. तेसुद्धा शिलकीत दाखविले. वेतन उपदानासाठी सहा कोटी ठेवी स्वरूपात आहे. हीच काय ती जमापुंजी नगरपालिकेकडे आहे. प्रस्तावित अर्थसंकल्पात २०१७-१८ चे खर्च विवरण दिले नाही. त्यामुळे सभापतींनी आक्षेप नोंदविला. नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्याकडेच या अर्थसंकल्पाची प्रत मंगळवारी रात्री ८.३० वाजता पोहोचली. मूळात स्थायी समितीच्या सूचनापत्रासोबतच अर्थसंकल्पाची प्रत पूर्वअभ्यासासाठी देणे अपेक्षित होते. यावरून प्रशासन अर्थसंकल्पाबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते.
आरोग्य, शिक्षण, बालकल्याणसाठी वाढीव बजेट
प्रस्तावित अर्थसंकल्पात सभापतींनी आरोग्य, शिक्षण व महिला बालकल्याण विभागासाठी असलेल्या बजेटमध्ये वाढ करण्याची सूचना केली. त्याला स्थायी समितीत सर्वानुमते मान्यता दिली गेली. स्थायी समितीची अर्थसंकल्पीय सभा सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरू होती.
जागेची मालकी नसताना मुख्याधिकाऱ्यांनी त्यातून उत्पन्न दाखविले. अर्थसंकल्पात नगरपरिषदेच्या उत्पन्नाचे व खर्चाचे मूळ विवरण ठेवण्याचे निर्देश दिले आहे. याशिवाय समिती सभापतींच्या सूचनांचाही त्यात अंतर्भाव करण्यास सांगितले.
- कांचन चौधरी
नगराध्यक्ष, यवतमाळ