कचराकोंडी सुटेना... यवतमाळमध्ये नगरसेविकेनं नगराध्यक्ष व सीओंच्या कक्षाला ठोकले टाळे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 04:41 PM2021-05-17T16:41:05+5:302021-05-17T16:41:27+5:30
शहरातील कचराकोंडी सुटत नसल्याचा राग सोमवारी नगरसेविकेने नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाला कुलूप ठोकून व्यक्त केला. तसेच आरोग्य विभागाच्या कक्षाला कुलूप लाऊन यंत्रणेचा निषेध नोंदवत त्याच ठिकाणी ठिय्या दिला.
यवतमाळ : शहरातील कचराकोंडी सुटत नसल्याचा राग सोमवारी नगरसेविकेने नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाला कुलूप ठोकून व्यक्त केला. तसेच आरोग्य विभागाच्या कक्षाला कुलूप लाऊन यंत्रणेचा निषेध नोंदवत त्याच ठिकाणी ठिय्या दिला.
नगर परिषदेत घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. ३ मे रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटाला दोन महिनेपर्यंत मंजुरी देण्यात आली. यावरून दोन आठवड्याचा कालावधी लोटूनही कचरा उचलण्याचे काम सुरू झाले नाही. मुख्याधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिला नसल्याने काम सुरू करण्यात आले नाही. विशेष म्हणजे, ज्या संस्थेला घनकचरा व्यवस्थापनाचे काम दिले त्या संस्थेची गैरव्यवहारप्रकरणी चौकशी सुरू आहे. या संस्थेला मान्यता देत नसल्याचा अभिप्रायही नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांनी नोंदविला होता.
या सर्व प्रकारात शहर स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. वार्डावार्डात कचऱ्याचे ढीग तयार झाले आहे. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. लोकांकडून वारंवार विचारणा केली जात आहे. यामुळेच प्रभाग क्र.५ च्या नगरसेविका वैशालीताई सवाई यांनी कुलूप ठाेकून निषेध नोंदविला.