यवतमाळ : गुन्हेगारी टोळ्या सक्रिय, छोटी गुजरीतील बारमध्ये झाला गोळीबार
By सुरेंद्र राऊत | Published: September 4, 2022 04:17 PM2022-09-04T16:17:33+5:302022-09-04T16:25:52+5:30
बार मालकाला बेदम मारहाण करून केली खंडणीची मागणी.
यवतमाळ : शहरातील गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. व्यावसायिकांनाही दिवसाढवळ्या धमकावले जात आहे. अशाच टोळीने छोटी गुजरी येथील एका वाईन बारमध्ये शनिवारी रात्री १०.३० वाजता हवेत गोळीबार करीत गोंधळ घातला. बार मालकाला बेदम मारहाण करून खंडणीची मागणी केली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांनी हल्लेखोरापैकी एकाला शनिवारी रात्री अटक केली.
छोटी गुजरीत सुरेश मोहनलाल जयस्वाल यांचा वाईन बार आहे. तेथे शनिवारी सायंकाळी ७ वाजतापासून सात जण दारू पिण्यास बसले होते. रात्री मोहन जयस्वाल यांचा पुतण्या रितेश दिनेश जयस्वाल हा पैशाचा हिशेब घेण्यासाठी नेहमीप्रमाणे आला. रात्री १०.३० ची वेळ होत असल्याने त्याने दारू पित असलेल्या सात जणांना बिल द्या, बार बंद करायची वेळ झाली आहे असे सांगितले. यावरून आरोपींनी त्याच्याशी वाद घातला. रितेशने काऊंटरवर जावून हिशेब करणे सुरू केले. दरम्यान दारू पित असलेले सात जण उठून काऊंटरकडे आले. मला ओळखत नाही का पैसे कशाचे मागतो असे म्हणून त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. तर इतरांनी काचेचे ग्लास फेकून मारले. यात रितेश दिनेश जयस्वाल गंभीर जखमी झाला.
त्या टोळक्याने बारमध्ये तोडफोड केली. कवट्या नामक आरोपीने देशी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला. दर महिन्याला पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल नाही तर जीवानिशी ठार करू अशी धमकी देऊन सातही जण निघून गेले. या प्रकरणी रितेश दिनेश जयस्वाल याच्या तक्रारीवरून रोहित जाधव, कवट्या उर्फ अलीम शेख (३०) रा. तलाव फैल, नयन सौदागर (२८), रिज्जू सयानी (२७), नईम खान गुलाब नबी खान उर्फ नईम टमाटर (३०), शेख इम्रान शेख सलीम उर्फ कांगारू (२९) रा. अलकबीरनगर, आदेश उर्फ आद्या खैरकर (२५) यांच्याविरुद्ध शहर पोलिसांनी कलम ३०७, ३८४, १४३, १४४, १४८, १४९, ५०६, १४७ आणि हत्यार प्रतिबंधक कायदा ३/२५ नुसार गुन्हा दाखल केला.
टमाटरला रात्रीच केली अटक
गंभीर गुन्हे शिरावर असलेल्या टोळक्याने बीअरबारमध्ये गोंधळ घातला. यातील नईम खान गुलाब नबी खान उर्फ टमाटर याला शहर पोलिसांनी घटनेनंतर काही मिनिटातच अटक केली. इतर आरोपी पसार झाले आहे. तर जखमीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.