सीडीआर चोरी प्रकरणी यवतमाळ सायबर सेलच्या पोलिसाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:38 PM2018-02-23T12:38:01+5:302018-02-23T12:41:11+5:30
राज्यभर गाजत असलेल्या एसडीआर व सीडीआर डाटा खासगी गुप्तहेराला पुरविल्याच्या प्रकरणात यवतमाळ सायबर सेलमध्ये कार्यरत पोलीस शिपायाला ठाणे क्राईम ब्रँचने गुरुवारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यभर गाजत असलेल्या एसडीआर व सीडीआर डाटा खासगी गुप्तहेराला पुरविल्याच्या प्रकरणात यवतमाळ सायबर सेलमध्ये कार्यरत पोलीस शिपायाला ठाणे क्राईम ब्रँचने गुरुवारी अटक केली. विशेष म्हणजे या प्रकरणात यापूर्वी अटकेत असलेला यवतमाळातील अजिंक्य नागरगोजे याला या शिपायाने डाटा पुरविल्याचे तपासात पुढे आल्याने ही कारवाई करण्यात आली.
नितीन खवडे (बक्कल नंबर २३४३) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. मागील अडीच वर्षापासून तो सायबर सेलमध्ये कार्यरत होता.
खासगी गुप्तहेराला डाटा विक्री करण्याच्या गुन्ह्यात ठाणे पोलिसांनी यवतमाळातील अजिंक्य नागरगोजे याला अटक केली. अजिंक्यने यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांचा मेलआयडी व पासवर्ड वापरून हा डाटा मिळविल्याचे सुरूवातीला सांगण्यात येत होते. मात्र या गुन्ह्याचा ठाणे क्राईम ब्रँचकडून तपास सुरू होता.
त्यासाठी यवतमाळ सायबर सेलच्या शिपायांना सलग दोन वेळा चौकशी करता ठाणे येथे पाचारण करण्यात आले. पोलीसांच्या चौकशीत अजिंक्य नागरगोजे याने खासगी गुप्तहेर रजनी पंडीत हिला विकलेला डाटा हा सायबर सेल मध्ये कार्यरत असलेला शिपाई नितीन खवडे याच्या आयडीवरून ट्रान्झीक्शन केल्याचे स्पष्ट झाले.
यावरून नितीनला पुन्हा बुधवारी चौकशी करता बोलावून ठाणे पोलिसांनी अटक केली. अजिंक्य नागरगोजे हा इथीकल हॅकर म्हणून यवतमाळ पोेलिसांसाठी काम करत होता.
याच काळात त्याची सायबर सेल मध्ये उठबस होती. नितीन खवडे याच्याशी त्याचा संबध आला आणि नितीने काही प्रतिष्ठांच्या मोबाईचा एसडीआर-सीडीआर अजिंक्यकडे फारवर्ड केला. ही लिंक ओपन झाली आहे.
खासगी गुप्तहेराने यवतमाळातील प्रतिष्ठीतांचा डाटा का मागविला. त्यासाठी कोणी डिमांड केली. याचा देखिल शोध ठाणे क्राईम ब्राँच घेणार आहे. पोलीस दलातील फितूरा शिवाय डाटा बाहेर जाणे शक्य नाही, असे सुरूवातीपासूनच सांगण्यात येत होते.