यवतमाळ जिल्ह्यात उन्हाळ्यातच १५ हजार विद्यार्थी पहिलीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 02:59 PM2018-06-07T14:59:37+5:302018-06-07T14:59:45+5:30
शाळा सुरू होण्याच्या दीड महिना आधीच तब्बल १५ हजार २१५ विद्यार्थ्यांची पटनोंदणी करून त्यांना पहिल्या वर्गात दाखलही करून घेतले आहे. उन्हाळी सुटीत पटनोंदणीचा उपक्रम राबविणारी यवतमाळ जिल्हा परिषद राज्यात एकमेव ठरली आहे.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील अनुदानित संस्थांच्या शाळांना विद्यार्थी मिळेनासे झालेले असताना जिल्हा परिषदेच्या शाळांनी मात्र यशस्वी कामगिरी बजावली आहे. शाळा सुरू होण्याच्या दीड महिना आधीच तब्बल १५ हजार २१५ विद्यार्थ्यांची पटनोंदणी करून त्यांना पहिल्या वर्गात दाखलही करून घेतले आहे. उन्हाळी सुटीत पटनोंदणीचा उपक्रम राबविणारी यवतमाळ जिल्हा परिषद राज्यात एकमेव ठरली आहे.
दरवर्षी, गावातील दाखलपात्र विद्यार्थी इंग्रजी शाळा खेचून नेतात. त्यासाठी स्कूल बसचाही पर्याय खेड्यातील पालकांना दिला जातो. या महागड्या शाळांमध्ये जाण्यापेक्षा खेड्यातील मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत यावी, याकरिता यंदा आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला होता. कुठेही गाजावाजा न करता जिल्हा परिषद शाळांच्या केंद्र प्रमुखांना ‘टार्गेट’ देण्यात आले. केंद्रातील प्रत्येक गावात किती दाखलपात्र विद्यार्थी आहेत, ते पडताळून त्यांच्या पालकांना भेटून मुलांना शाळेत आणण्याची सूचना देण्यात आली होती. विशेष म्हणजे, त्यासाठी एक आॅनलाईन लिंक तयार करून प्रत्येक शिक्षकाच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात आली. कोणत्या शाळेत किती विद्यार्थ्यांची पटनोंदणी करण्यात आली, त्याची माहिती दररोज या लिंकवर भरली गेली.
विशेष म्हणजे, उन्हाळी सुटीतच दाखल केलेल्या या विद्यार्थ्यांसाठी अनेक शाळांनी सुटीमध्येही आनंददायी वर्ग भरविले. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील २१०१ शाळांमध्ये हा उपक्रम राबविला गेला. शिक्षकांनी मार्च महिन्यात गावात फिरून दाखलपात्र विद्यार्थ्यांना शाळेत आणले. त्यांचा स्वागत समारंभ घेतला. त्यांच्यासाठी खेळ, गाण्यांचे कार्यक्रम घेतले. २१०१ पैकी आतापर्यंत १७५४ शाळांनी १५ हजार २१५ विद्यार्थ्यांची पटनोंदणी केल्याची आकडेवारी लिंकवर भरण्यात आली आहे. तर इतर शाळांनीही पटनोंदणी केली आहे.
पुसद, उमरखेड, आर्णी, घाटंजीची झेप
शाळापूर्व पटनोंदणी उपक्रमात पुसद, उमरखेड, आर्णी, घाटंजी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनी बाजी मारली आहे. पुसद तालुक्यात तब्बल २०५२, उमरखेड १७९९, महागाव १६००, आर्णी १११६, तर घाटंजी तालुक्यात १०२४ विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीतच पहिल्या वर्गात दाखल करण्यात आले. त्यानंतर दारव्हा तालुक्यात १०१९, यवतमाळात ९५१, दिग्रसमध्ये ७१६, कळंब ७११, नेर ६९१, झरी ६५८, बाभूळगाव ६५६, पांढरकवडा ६२६, मारेगाव ६०२, वणी ५५८, तर राळेगावात ४३६ विद्यार्थी उन्हाळी सुटीतच जिल्हा परिषद शाळेत दाखल झाले आहेत.