यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा ; तिघांचा बुडून मृत्यू, एक बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2022 01:43 PM2022-09-13T13:43:03+5:302022-09-13T13:43:28+5:30

नऊ तालुक्यांना झोडपले : दारव्ह्यात ९९.९ तर आर्णी तालुक्यात ११५ मिमी पावसाची नोंद

Yavatmal district again hit by heavy rains; Three drowned, one missing | यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा ; तिघांचा बुडून मृत्यू, एक बेपत्ता

यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा ; तिघांचा बुडून मृत्यू, एक बेपत्ता

Next

यवतमाळ : यंदाच्या पावसाळ्यात तब्बल दहाव्या वेळेस जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी ७०.३ मिमी पाऊस झाला आहे. आर्णी तालुक्यात सर्वाधिक ११५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पांढरकवडा तालुक्यात दोघांचा वाहत्या नाल्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर उमरखेड तालुक्यातील चिल्ली शिवारात पाय घसरुन पडल्याने ५५ वर्षीय वृद्धाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

रविवारी पहाटेपासून जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरला. दिवसभर अधूनमधून पाऊस कोसळत होता. सोमवारीही जिल्ह्याच्या विविध भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी ७०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यवतमाळ तालुक्यात ५७.७, बाभूळगाव ७८.५, कळंब ६५.६, दारव्हा ९९.९, दिग्रस ५६.४, आर्णी ११५.२, नेर ८५.५, पुसद २६.७, उमरखेड ५६.८, महागाव ५९.१, वणी ९०.६, मारेगाव ५७.१, झरी जामणी ७९.३, केळापूर ८४.६, घाटंजी ७६.२ तर राळेगाव तालुक्यात ५६.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या विविध ठिकाणच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पांढरकवडा तालुक्यात दोघांचा बुडून मृत्यू

सतत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी व नाले तुडुंब भरले असून वेगवेगळ्या घटनेत पांढरकवडा तालुक्यातील दोघा जणांचा वाहत्या नाल्यात बुडून मृत्यू झाला. दहेली तांडा येथील भारत पुरुषोत्तम राठोड हा १३ वर्षीय मुलगा रविवारी दुपारी ३.३० वाजता बाहेर जातो म्हणून सांगून गेला होता. परंतु घरी परत न आल्यामुळे शोधाशोध केली असता, सोमवारी सकाळी ८ वाजता त्याचा मृतदेहच शेतालगतच्या नाल्यात आढळून आला. दुसरी घटना चालबर्डी शेतशिवारात घडली. बंडू राघोजी कोहचाडे (५५) हे रविवारी संध्याकाळी ५.३० वाजताच्या सुमारास शेतातून घरी परत येत असताना पुलावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. रात्रभर त्यांचा शोध घेतला असता, त्यांचा शोध लागला नाही. परंतु सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह आकोली शेतशिवारातील नाल्यात आढळून आला.

लाडकी येथे पुराच्या पाण्यात वृद्ध वाहून गेला

राळेगाव तालुक्यातील लाडकी येथील अण्णाजी बाळकृष्ण गुडदे (वय ६५) हे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. ते वडकीवरून आपल्या गावी लाडकी येथे परतत होते. गावालगत नाल्याच्या कमी उंचीच्या पुलावरून वाहत असलेल्या पुराच्या पाण्यात ते वाहून गेले. गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, यश आले नाही. प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान, या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करूनही त्याकडे कानाडोळा होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पारवा येथे ४० घरांमध्ये शिरले पुराचे पाणी

पारवा परिसरात रविवारी सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. त्यामुळे येथून वाहणाऱ्या नाल्याला पूर येऊन ३५ ते ४० घरांमध्ये पाणी शिरले. घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. पाच ते सहा घरांच्या भिंती कोसळल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मु्ख्य रस्त्यावरील दहा ते १५ दुकानात पाणी शिरले. याची माहिती नायब तहसीलदार राठोड यांच्यासह तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आली. यंत्रणेकडून पारवा (ता. घाटंजी) येथील नुकसानग्रस्तांची यादी तयार करणे सुरू केले आहे.

नेर तालुक्यात १५ घरांचे नुकसान

नेर तालुक्यात गेल्या ३६ तासांपासून सुरू असलेल्या पावसाचा शेतीपिकांसह घरांनाही फटका बसला. पिंप्री मुखत्यारपूर येथील विशाल गोंडाने व चिचगाव येथील वसंतराव महल्ल्ले यांच्या शेताला नदीचे स्वरूप आले आहे. १५ घरांचे नुकसान झाल्याची माहिती नायब तहसीलदार नरेंद्र थोटे, प्रमोद ताकसांडे यांनी दिली. तालुक्यातील बोंडगव्हाण, रत्नापूर, लोहतवाडी, मोझर, व्याहाळी, वटफळा, मांगलादेवी, दहीफळ परिसरात शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डोल्हारी नदीला पूर आल्याने नेर-डोल्हारी-दारव्हा व ब्राम्हणवाडा-नेर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

तलावात पाय घसरुन पडल्याने एकाच मुत्यू

उमरखेड तालुक्यातील चिल्ली (ज.) शिवारातील महादेव रामधन राठोड (वय ५५) असे मृताचे नाव आहे. शनिवारी महादेव शेळ्यांसाठी चारा आणायला गेले होते. सायंकाळी घराकडे परत येत असताना ते पाय घसरून तलावात पडले. काही वेळानंतर घरातील मंडळींनी व गावकऱ्यांनी शोध सुरू केला. त्यावेळी तलावाच्या काठावर त्यांची चप्पल तरंगताना दिसली. लगेच सरपंच व पोलीस पाटील यांनी पोलीस व तहसीलदारांना माहिती दिली. तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ९ वाजता आपत्कालीन जवानांना चिल्ली जहागीर येथे रवाना केले. रविवारी एनडीआरएफच्या पथकाने दिवसभर शोध कार्य केल्यानंतरही मृतदेह सापडला नाही. दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शोध कार्यात अडथळा येत होता.

तिसऱ्या दिवशी सोमवारी गावकऱ्यांना तलावात मृतदेह तरंगत असल्याचे आढळले. त्यांनी पोलीस प्रशासनाला माहिती दिली. ठाणेदार अमोल माळवे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिरसाट यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला व पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उमरखेड तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आला आहे.

Web Title: Yavatmal district again hit by heavy rains; Three drowned, one missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.