यवतमाळ जिल्ह्यात नाल्यात कोसळलेली बस क्रेनच्या सहाय्याने काढली बाहेर; चौघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 06:53 PM2021-09-28T18:53:48+5:302021-09-28T18:54:14+5:30
Yawatmal News पुराच्या पाण्यात वाहून गेलेली एसटी बस दुपारनंतर बाहेर काढण्यात आली. नाल्यात कोसळल्याने चालक-वाहकासह चार जणांचा मृत्यू झाला असून दोन प्रवासी संकटकालीन खिडकीतून बाहेर निघाल्याने वाचले आहेत.
यवतमाळ : पुराच्या पाण्यात वाहून गेलेली एसटी बस दुपारनंतर बाहेर काढण्यात आली. नाल्यात कोसळल्याने चालक-वाहकासह चार जणांचा मृत्यू झाला असून दोन प्रवासी संकटकालीन खिडकीतून बाहेर निघाल्याने वाचले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास पुसद मार्गावरील दहागाव पुलावर घडली.
नांदेडहून पुसदमार्गे नागपूरसाठी निघालेली एम.एच.१४/बी.टी.५०१८ या क्रमांकाची बस उमरखेड पार केल्यांनतर पुसद रोडवर २ किलोमीटर अंतरावर असलेल्या दहागावपर्यंत पोहोचली. याठिकाणी असलेल्या नाल्याला पूर आला होता. तरीही चालकाने या पुरातून बस टाकली. मात्र काही अंतर पार करत नाही तोच बस कलंडायला लागली. त्यानंतर काही क्षणातच पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बस नाल्यात वाहून गेली.
या बसमध्ये चालक, वाहकचार प्रवासी असे सहा जण होते. यातील दोघे खिडकीतून बाहेर पडल्याने बचावले. यामध्ये शिक्षक असलेले सुब्रमण्यम सूर्यनारायण नोल्ला (४८, रा.दिग्रस, मूळ हैदराबाद), शरद नामदेव फुलमाळी (२७, रा. कारोळ, ता. पुसद) यांचा समावेश आहे. मृतांमध्ये चालक सुरेश सुरेवार (५३), वाहक भीमराव नागरीकर, प्रवासी इंदल मेहत्रे (२८, रा. वारा, ता. पुसद), शे. सलीम ऊर्फ बाबू शेख इब्राहीम (४०, रा. वारा, ता. पुसद) यांचा समावेश आहे. अपघातानंतर तातडीने मदतकार्य हाती घेण्यात आले. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने एसटी बस नाल्यातून थोडी वर उचलत टीडीआरएफच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवचिकित्सेसाठी रवाना करण्यात आले. उमरखेड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. नदी, नाल्यांना पूर आला असून, प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना केल्या आहेत.
लोकप्रतिनिधी व लोकांचे मदतकार्य
एसटी बस पाण्यात कोसळताच लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. सुब्रमण्यम नोल्ला व शरद फुलमाळी हे दोघे संकटकालीन मागार्तून कसेबसे बाहेर पडले. या दोघांनाही पुरातून बाहेर काढण्यात अविनाश सवाई राठोड (रा. वाकन, ता. महागाव) या युवकाने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. खासदार हेमंत पाटील, उमरखेडचे आमदार नामदेव ससाने, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा आदींनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेतली. परिवहन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक शिवाजी जगताप, यंत्र अभियंता अविनाश राजगुरे, विभागीय वाहतूक अधिकारी राठोड, मेश्राम, उमरखेडचे आगार व्यवस्थापक भदाडे, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार आनंद देऊळगावकर, ठाणेदार अमोल माळवे या ठिकाणी तळ ठोकून होते.