यवतमाळ जिल्ह्यात वीज जोडणी नसताना शेतक-याला आले २६ हजारांचे बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:58 PM2018-01-22T12:58:07+5:302018-01-22T13:37:10+5:30
वीज जोडणीच्या प्रतीक्षेत चार वर्षापासून असलेल्या एका शेतकऱ्याला वीज जोडणी तर मिळालीच नाही उलट वीज वितरण कंपनीने त्यांना चक्क २६ हजार रुपयाचे वीज बिल पाठविले.
हरिओम बघेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वीज जोडणीच्या प्रतीक्षेत चार वर्षापासून असलेल्या एका शेतकऱ्याला वीज जोडणी तर मिळालीच नाही उलट वीज वितरण कंपनीने त्यांना चक्क २६ हजार रुपयाचे वीज बिल पाठविले. वीज पुरवठा नसताना आलेले बिल पाहून आर्णी तालुक्यातील कोपरा येथील शेतकऱ्याचे डोळे पांढरे झाले आहे.
अंबादास श्रीराम खापरकर असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचे कोपरा शिवारात शेत आहे. सिंचनासाठी त्यांनी आपल्या शेतात बोअरवेल खोदली. त्यानंतर वीज वितरण कंपनीकडे जोडणीसाठी रितसर अर्ज केला. ३ जानेवारी २०१३ रोजी वीज वितरणकडे डिमांड भरले. शेतात वीज जोडणीसाठी पाच खांब लावावे लागतील असे कारण सांगून जोडणी दिली नाही. मात्र आता वीज वितरण कंपनीने त्यांना तब्बल २६ हजार ४० रुपयाचे बिल पाठवून दिले.
वीज बिल पाहून शेतकरी हैराण झाला. त्यांनी वीज वितरणचे कनिष्ठ अभियंता मुकेश गुल्हाने यांच्याशी संपर्क साधला. मी नवीन आहे, मला काहीच माहित नाही, चौकशी करून सांगतो असे ठेवणीतील उत्तर दिले. आपल्याकडे विजच नाही तर बिल भरायचे कसे असा सवाल ते करीत आहे. अंबादासकडे दोन एकर शेती असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह आहे. सिंचनातून हिरवे स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्याची वीज वितरण कंपनीने मात्र थट्टा चालविली आहे.
वीज जोडणीसाठी धडपड
अंबादास खापरकर आपल्या शेतात वीज जोडणी मिळावी म्हणून वीज वितरणचे उंबरठे झिजवत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधिनाही त्यांनी याबाबत माहिती दिली.परंतु चार वर्षापासून वीज जोडणी मिळाली नाही. त्यांच्या नावावरील वीज जोडणी दुसऱ्याला तर दिली नाहीना त्यामुळे बिल तर आले नसावेना अशी शंका व्यक्त होत आहे.