का नाही मिळाली भरपाई, अखेर झाले कारण स्पष्ट
By विलास गावंडे | Published: March 13, 2023 02:59 PM2023-03-13T14:59:24+5:302023-03-13T15:00:11+5:30
मल्टीसर्व्हिसेस सेंटरला दणका : यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाची चपराक
यवतमाळ : पैशांची जुळवाजुळव करून शेतकऱ्याने पीक विमा काढला. अतिवृष्टी व रोगराईमुळे ज्वारी पिकाचे नुकसान झाले. विम्याची भरपाई मिळेल, अशी आशा असतानाच धक्का देणारी बातमी कानावर पडली. ज्वारीचा विमा काढलाच नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. अखेर कारण स्पष्ट झाले. जिल्हा ग्राहक आयोगाने मल्टीसर्व्हिसेस सेंटरला दणका दिला. शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याचा आदेश देण्यात आला.
कळंब तालुक्यातील हिवळणी येथील अंकुश तुकाराम राठोड यांनी त्यांच्या हिवळणी (खु.) व पिंपळगाव (इ) शिवारात असलेल्या शेतातील सर्व पिकांचा विमा काढण्यासाठी पुसद येथील पवार मल्टीसर्व्हिसेस ॲण्ड ऑनलाइन सेंटरमधून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली. इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून विमा काढण्यात आला. ऑनलाइन सेंटर चालकानेही राठोड यांच्या सर्व पिकांचा विमा काढला असल्याचे सांगून पावत्याही दिल्या.
पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्याने राठोड यांनी विम्याच्या भरपाईकरिता प्रक्रिया सुरू केली. तेव्हा त्यांना ज्वारी पिकाचा विमा काढलाच नसल्याचे सांगितले गेले. ही बाब चौकशीअंती खरी ठरली. सर्व्हिसेस सेंटरने राठोड यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे व सदस्य हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. अंकुश राठोड यांना सर्व्हिसेस सेंटरने नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश देण्यात आला.
नऊ टक्के व्याजासह भरपाई
अंकुश राठोड यांनी पिकाच्या नुकसानाची एक लाख १५ हजार २०० रुपये भरपाई आणि शारीरिक व मानसिक त्रासापोटी ५० हजार रुपये मिळावेत, अशी विनंती आयोगाकडे केली होती. आयोगाने पीक विम्याची भरपाई वीस हजार रुपये नऊ टक्के व्याजासह आणि तक्रार खर्चाचे तीन हजार रुपये देण्याचा निर्णय दिला आहे. सर्व्हिसेस सेंटरचे संचालक विशाल पवार हे मात्र सुनावणी सुरू असताना आयोगापुढे हजर झाले नव्हते.